अखेर ५० वर्षांचा वनवास संपला! आमदार अमोल खताळ यांच्या पुढाकाराने गव्हाळी वस्तीचा बंद रस्ता झाला खुला

अडीचशे ते तीनशे नागरिकांना दिलासा; तीन ते चार किलोमीटरचा शिवरस्ता अवघ्या १५ दिवसांत अतिक्रमणमुक्त

संगमनेर | प्रतिनिधी

संगमनेर तालुक्यातील मालदाड-घुलेवाडी शिवेवरील गव्हाळी वस्तीला जाणारा सुमारे तीन ते चार किलोमीटर अंतराचा महत्त्वाचा शिवरस्ता गेल्या तब्बल पन्नास वर्षांपासून विविध अतिक्रमणांमुळे बंद अवस्थेत होता. परिणामी परिसरातील शेतकरी, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवनात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र आमदार अमोल खताळ यांच्या पुढाकारामुळे आणि महसूल व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हा रस्ता तीन टप्प्यांत अवघ्या पंधरा दिवसांत अतिक्रमणमुक्त करून नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे.

मालदाड व घुलेवाडी परिसरातील अनेकांनी वर्षानुवर्षे शिवरस्त्यावर अतिक्रमणे केली होती. त्यामुळे गव्हाळी वस्तीतील सुमारे अडीचशे ते तीनशे नागरिकांचा गावाशी संपर्क साधणारा महत्त्वाचा मार्गच बंद झाला होता. शेतमाल वाहतूक, विद्यार्थ्यांची शालेय ये-जा, रुग्णांची ने-आण तसेच नागरिकांची दैनंदिन कामे मोठ्या अडचणीने पार पडत होती. या प्रश्नाबाबत परिसरातील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी अनेकदा प्रशासन व लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला होता; मात्र प्रश्न कायम प्रलंबित राहिला.
अखेर गव्हाळी वस्तीतील शेतकरी, महिला आणि युवकांनी एकत्र येत आमदार अमोल खताळ यांची भेट घेतली. आपल्या रस्त्याचा प्रश्न सोडविण्याची अपेक्षा व्यक्त करत त्यांनी संपूर्ण परिस्थिती आमदारांच्या निदर्शनास आणून दिली. याची तात्काळ दखल घेत आमदार खताळ यांनी महसूल विभागाला पाहणी करून शिवरस्ता योजनेअंतर्गत रस्ता खुला करण्याचे निर्देश दिले.

त्यानुसार तहसीलदार धीरज मांजरे यांनी स्वतः घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी मालदाड व घुलेवाडी येथील महसूल अधिकाऱ्यांना रस्ता तातडीने खुला करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर घुलेवाडीचे मंडलाधिकारी रफिक शेख, महसूल अधिकारी बाळकृष्ण सावळे, मालदाडचे महसूल अधिकारी राहुल ढेरंगे, भूमीअभिलेख विभागाचे भूमापक नितीन हंडोरे तसेच तालुका पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या संयुक्त पथकाने मोहीम राबवून अत्यंत खडतर मानला जाणारा हा शिवरस्ता तीन टप्प्यांत अतिक्रमणमुक्त केला.
कारवाईदरम्यान अनेक अडथळे आणि अडचणी निर्माण झाल्या; मात्र प्रशासनाने संयम आणि नियोजनाच्या जोरावर त्या दूर करत रस्ता मोकळा केला. गेली अनेक दशके बंद असलेला हा मार्ग अखेर खुला झाल्याने गव्हाळी वस्ती आणि परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी आमदार अमोल खताळ तसेच प्रशासनाचे मनापासून आभार मानले आहेत.

आता विकासाचा मार्गही मोकळा होणार…

गेल्या अनेक दशकांपासून बंद असलेला मालदाड-घुलेवाडी शिवरस्ता खुला झाल्यामुळे गव्हाळी वस्तीतील नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अनेक अडचणी दूर होणार आहेत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठीची ये-जा, शेतमालाची वाहतूक, रुग्णांची ने-आण आणि नागरिकांची दैनंदिन कामे आता अधिक सुलभ होणार आहेत. रस्ता खुला झाल्याचा आनंद असला तरी त्याचे मजबुतीकरण आणि डांबरीकरण लवकरात लवकर करण्यात यावे, अशी अपेक्षा ज्येष्ठ नागरिक दत्तू नवले, राहुल नवले, गणेश नवले, संतोष नवले, दिगंबर दिघे, प*** नवले सिद्धार्थ भालेराव गोकुळ नवले नितीन नवले अण्णासाहेब नवले सुनील नवले विकास नवले भाऊसाहेब नवले सुलोचना नवले रेखा नवले, अनिता नवले कुमारी श्रावणी नवले, कार्तिक नवले यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
……………………………………..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!