अजित पवार यांच्या निधनाबद्दल सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन!

संगमनेर / प्रतिनिधी

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेर शहर व तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या वतीने गुरुवारी (दि. ५) रोजी सकाळी १० वाजता सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

स्व. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. प्रशासनावर असलेली पकड, अभ्यासू नेतृत्व आणि निर्णयक्षमता यांमुळे ते जनतेमध्ये लोकप्रिय होते. त्यांच्या अकाली जाण्याने राज्याने एक सक्षम, अनुभवी आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व गमावले असल्याच्या भावना सर्व स्तरांतून व्यक्त केल्या जात आहेत. ही सर्वपक्षीय शोकसभा मालपाणी लॉन्स येथे आयोजित करण्यात आली असून, यावेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे प्रतिनिधी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

शोकसभेत स्व. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकीय, सामाजिक व प्रशासकीय योगदानाला श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार असून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जाणार आहे. शोकसभेला शहर व तालुक्यातील शिवसेना महायुतीचे पदाधिकारी, शिवसैनिक व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेनेचे तालुकाप्रमुख रामभाऊ राहाणे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!