पिंपरणे येथे गॉड्स असेंबल मिनिस्ट्रीतर्फे व्यावसायिक मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न
पिंपरणे (ता. संगमनेर) :
दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी गॉड्स असेंबल मिनिस्ट्री या संस्थेच्या वतीने पिंपरणे येथे महिलांसाठी व्यावसायिक मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाचे अध्यक्षपद पिंपरणे येथील सामाजिक कार्यकर्ते माननीय प्रकाश गायकवाड यांनी भूषविले.
या प्रशिक्षण कार्यशाळेत विशाल सर यांनी घरगुती वापरातील फिनेल, भांडे धुण्याचे लिक्विड तसेच कपडे धुण्यासाठी वॉशिंग पावडर तयार करण्याची प्रत्यक्ष प्रात्यक्षिके करून दाखवली. महिलांनी या प्रक्रियेची सविस्तर माहिती घेतली व मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला.
कार्यशाळेत घरगुती उत्पादने स्वतः तयार करण्याचे फायदे सांगण्यात आले. बाजारातील महागड्या उत्पादनांच्या तुलनेत घरगुती बनवलेली उत्पादने स्वस्त, टिकाऊ व सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले. तसेच ही वॉशिंग पावडर वॉशिंग मशीनसाठीही उपयुक्त असून मशीनची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यास मदत करते, असे मार्गदर्शन करण्यात आले.
व्यावसायिक दृष्टीकोनातून महिलांना प्रेरणा देताना सांगण्यात आले की, बचत गट किंवा व्यक्तीने दैनंदिन वापरातील उत्पादने तयार करून विक्री केल्यास गावातच चांगला व्यवसाय उभा राहू शकतो. गावातील लोकांनीच उत्पादने वापरल्यास गावातला पैसा गावातच फिरून स्थानिक अर्थव्यवस्था बळकट होईल.
कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्रकाश गायकवाड यांनी संस्थेच्या या समाजोपयोगी उपक्रमाचे कौतुक केले व महिलांना बचत व स्वावलंबनाबाबत मार्गदर्शन केले.
गॉड्स असेंबल मिनिस्ट्रीच्या अध्यक्षा मा. उज्वला जगताप मॅडम यांनी अध्यक्ष प्रकाश गायकवाड, उपक्रमाचे आयोजन करणारे मा. मच्छिंद्र जगताप सर तसेच उपस्थित सर्व महिला व नागरिकांचे आभार मानले.
सदर कार्यशाळा उत्साहात व यशस्वीरित्या पार पडली.
