टाकळी शाळेत हिंद की चादर व कुसुमाग्रज वाचन अभियानाचा शुभारंभ
सेवानिवृत्त केंद्रप्रमुख तिकांडे यांच्याकडून शाळेस ११०० रूपयांची पुस्तके भेट
अकोले –
अहिल्यानगर जिल्हा परिषद व पंचायत समिती शिक्षण विभाग अकोले मार्फत राबविण्यात येत असलेले हिंद की चादर व कुसुमाग्रज वाचन अभियान या उपक्रमांचा केंद्रशाळा टाकळी येथे मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला. या निमित्ताने शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब फोडसे यांच्या शुभहस्ते शालेय ग्रंथदालनाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी टाकळी गावातील सेवानिवृत्त केंद्रप्रमुख शिवाजी तिकांडे यांनी शालेय ग्रंथालयासाठी ११००/- रुपयांची अवांतर वाचनाची दर्जेदार पुस्तके भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये तसेच समाजात वाचन संस्कृती दृढ होण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांनी वाचन चळवळीचा जयघोष करीत ग्रंथदिंडी काढली. कार्यक्रमाचे औचित्य साधून शाळेमार्फत निबंध लेखन, प्रश्नमंजुषा, सामुदायिक वाचन, साखळी वाचन, मूक वाचन, पासवर्ड वाचन, सारांश लेखन, गोष्ट सादरीकरण व विद्यार्थी गौरव हे उपक्रम घेण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना शिखांचे ९ वे धर्म गुरू तेज बहादुर यांच्या जीवन चरित्रावर आधारित डाॅक्युमेंटरी दाखविण्यात आली. याशिवाय धर्मगुरूंची भक्ती गीते ऐकविण्यात येवून स्वच्छता मोहीम देखील राबविण्यात आली. प्रस्तुत कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मुख्याध्यापक डॉ.श्रीनिवास पोतदार यांनी केले तर वाचन अभियान तथा हिंद की चादर उपक्रमांचे संयोजन सहशिक्षक दत्तात्रय देवगिरे, संजय देशमुख व श्रीमती संगिता धिंदळे यांनी यशस्वीपणे पार पाडले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापनाचे दादा पाटील तिकांडे, डॉ.जनार्दन मोरे, पोपटराव शेवाळे, दत्ताराम दातखिळे व रामहरी तिकांडे उपस्थित होते. कुसुमाग्रज वाचन अभियान व हिंद की चादर निमित्ताने टाकळी शाळेने राबविलेल्या विविध उपक्रमांचे अकोले तालुका गट शिक्षणाधिकारी अरविंद कुमावत, देवठाण बीट शिक्षण विस्तार अधिकारी अनिल गायकवाड व केंद्रप्रमुख श्रीमती रोहिणी खतोडे यांनी विशेष अभिनंदन करून कौतुक केले आहे.
