सह्याद्री ज्युनिअर कॉलेजमध्ये मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा

संगमनेर (प्रतिनिधी) –

दरवर्षी मराठी राजभाषा राज्यात मोठ्या उत्सहात साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर संगमनेर शहरातील सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज संस्थेच्या भाऊसाहेब गुंजाळ पाटील महाविद्यालयात मराठी राजभाषा दिन अत्यंत उत्साहपूर्ण आणि अभिमानाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. मराठी भाषेच्या जतन, संवर्धन आणि प्रसाराचा दृढ संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकवृंदाने मोठ्या उत्साहाने सहभाग घेत मराठी भाषेप्रती आपली निष्ठा व्यक्त केली.

कार्यक्रमाची सुरुवात मराठी भाषेचे ज्येष्ठ कवी व साहित्यिक वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कुसुमाग्रज यांच्या साहित्यसेवेचा गौरवपूर्वक उल्लेख करत त्यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. त्यांच्या लेखणीतून मराठी भाषेला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली असून, “मराठी ही आपल्या अस्मितेची आणि संस्कृतीची ओळख आहे,” हा संदेश त्यांच्या साहित्यकृतीतून सातत्याने अधोरेखित होत असल्याचे मान्यवरांनी सांगितले.

या कार्यक्रमास प्राचार्य एस. एम. खेमनर सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचा अभिमान बाळगण्याचे आणि दैनंदिन जीवनात मराठीचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन केले. “जागतिकीकरणाच्या युगात मातृभाषेचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी उपप्राचार्य प्रा. संजय सुरसे, पर्यवेक्षक प्रा. बी. एस. कुटे, शिक्षक प्रतिनिधी प्रा. गणेश गुंजाळ, शिक्षिका प्रतिनिधी प्रा. गायत्री काळे, मराठी विभाग प्रमुख प्रा. भा. मा. धाकतोडे, प्रा. एन. आर. जगताप, प्रा. संतोष भालेराव, प्रा. मनोज जगताप, प्रा. कडनर, प्रा. जी. सी. भवर आदी शिक्षकवृंद व्यासपीठावर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी मराठी भाषेचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी भाषण, कविता वाचन आणि मराठी साहित्याशी संबंधित उपक्रम सादर केले. काही विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रज यांच्या कवितांचे प्रभावी सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली. मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेचा आणि साहित्यवैभवाचा परिचय करून देणारे विचार मांडण्यात आले.
सूत्रसंचालन प्रा. एन. आर. जगताप यांनी प्रभावीपणे केले. त्यांनी कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण करत प्रत्येक घटक सुरळीत पार पाडला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

एकूणच, मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये मातृभाषेप्रती अभिमानाची भावना जागृत झाली. मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा वारसा आहे, याची जाणीव या कार्यक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!