अहिल्यानगर बरोबरीचे संगमनेर लोकसभा मतदारसंघ निर्माण करण्याची मागणी

संगमनेर

संगमनेर व अकोले तालुक्याचा स्वतंत्र लोकसभा मतदारसंघ निर्माण करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. हे निवेदन परिसीमन आयोगाचे अध्यक्ष, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच जलसंपदा मंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पाठविण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, संगमनेर तालुक्यात १७९ गावे व २४० हून अधिक वाड्या-वस्त्या असून अकोले तालुक्यात १९९ गावे व सुमारे ३०० वाड्या-वस्त्या आहेत. या दोन्ही तालुक्यांचा समावेश करून स्वतंत्र लोकसभा मतदारसंघ निर्माण केल्यास दुर्गम डोंगराळ भागातील आदिवासी जनता तसेच इतर सर्वसामान्य नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे शक्य होईल.

सध्या या भागातील लोकसंख्या, भौगोलिक विस्तार आणि विकासाच्या गरजा लक्षात घेता स्वतंत्र मतदारसंघाची आवश्यकता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शासनाने या भागाचा सर्वांगीण विचार करून लोकसभा मतदारसंघ निर्मितीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच महाकाय व विस्तीर्ण संगमनेर-अकोले विभागाचे विभाजन करून संगमनेर जिल्हा व स्वतंत्र लोकसभा मतदारसंघ तयार करण्यात यावा, अशीही जनतेची भावना असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

हे निवेदन आत्माराम गजानन देशमुख यांनी संगमनेर व अकोले तालुक्यातील जनतेच्या वतीने दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!