*रामराज्य शस्त्राने नव्हे, शास्त्राने येते : ढोक महाराज*
बंधुभाव हा रामायणाचा आदर्श
_धर्मकार्यासाठी दृढ इच्छाशक्ती आवश्यक_
रामकथेचा समारोप
*सात लाख भाविकांनी कथेचे केले श्रवण*
संगमनेर
रामराज्य हे शस्त्राच्या बळावर नव्हे, तर शास्त्र, संस्कार आणि सदाचाराच्या आधारावर उभे राहते. धर्मकार्यासाठी दृढ इच्छाशक्ती आवश्यक असून इच्छाशक्तीशिवाय कोणतेही धर्मकार्य यशस्वी होऊ शकत नाही. बंधुभाव हा रामायणाचा खरा आदर्श आहे असे प्रतिपादन रामायणाचार्य ढोक महाराज यांनी केले.
स्व. जयवंतराव गुंजाळ व श्री. बाळासाहेब गुंजाळ यांच्या मळ्यात, गुंजाळवाडी येथे परमपूज्य गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहात अधिक मासातील आठव्या पर्वाचा आणि रामकथेच्या समारोपप्रसंगी ढोक महाराजांनी आपल्या मधुर, रसाळ आणि ओजस्वी वाणीतून रामायणातील युद्धकांड आणि रामराज्य स्थापनेचे प्रभावी निरूपण केले. लंकाकांडाचा प्रसंग उलगडताना त्यांनी राम रावण युद्ध अक्षरशः श्रोत्यांच्या डोळ्यांसमोर उभे केले. नल नील यांनी उभारलेल्या रामसेतूचे वर्णन करताना एका दगडावर ‘रा’ आणि दुसऱ्यावर ‘म’ लिहून समुद्रावर सेतू उभारल्याची कथा सांगितली. अवघ्या पाच दिवसांत शंभर योजनांचा सेतू पूर्ण झाल्याचे सांगताना रामनामाच्या सामर्थ्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. ज्या स्थळी प्रभू रामांनी शिवलिंगाची स्थापना केली, तेच आजचे रामेश्वरम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
युद्धकांडाचे विवेचन करताना अंगदशिष्टाई, रथी, अतिरथी आणि महारथींचे सामर्थ्य, तसेच राम व रावणाच्या सेनापतींच्या शौर्याचा त्यांनी सविस्तर ऊहापोह केला. इंद्रजिताच्या शक्तीने लक्ष्मण मूर्च्छित झाल्यानंतर सुषेण वैद्यांनी केलेले उपचार, संजीवनीचे महत्त्व आणि द्रोणागिरी पर्वत आणण्यासाठी निघालेल्या हनुमान व भरत यांच्या भेटीचा प्रसंग ऐकताना सभागृह भावनांनी भारावून गेले. लक्ष्मणाने इंद्रजिताचा, तर प्रभू रामांनी रावणाचा वध करून धर्माचा विजय प्रस्थापित केल्याचे सांगताना उपस्थित भाविकांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला. युद्धानंतर रावणाची उत्तरक्रिया करून बिभीषणाला लंकेचे राज्य बहाल करण्यात आल्याचा प्रसंगही त्यांनी प्रभावीपणे मांडला.
रामायणाचा खरा संदेश हा गुरूमिलन, मातृभक्ती, बंधुमिलन, त्याग आणि कर्तव्यनिष्ठा यामध्ये दडलेला असल्याचे सांगताना चौदा वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत परतलेल्या प्रभू रामांचे गुरु, माता आणि बंधूंशी झालेले मिलन त्यांनी अत्यंत भावपूर्ण शब्दांत वर्णन केले. या प्रसंगी अनेक भाविकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. रामाचा राज्याभिषेक म्हणजे धर्म, न्याय आणि लोककल्याणाचा विजय असल्याचे सांगत धर्मकार्यासाठी दृढ इच्छाशक्ती लागते हा संदेश देऊन रामकथेचा भावपूर्ण समारोप करण्यात आला.
यावेळी कथा समितीचे अध्यक्ष दिलीपराव शिंदे, उद्योजक आबासाहेब थोरात, संजय पाटणकर व पाटणकर परिवारातील सदस्य, कपिल पवार, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार अमोल खताळ, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांच्यासह सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, उद्योजक आणि हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
