गुंजाळवाडीत हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने भक्तीचा महासागर ;

 भव्य दिव्य मिरवणुकीने विश्व गौरव विभूषित परमपूज्य गगनगिरी महाराज सप्ताहास सुरुवात 

गगनगिरी महाराजांची अद्भुत शक्ती प्रत्येकाला सकारात्मक ऊर्जा देईल – आबासाहेब थोरात

संगमनेर (प्रतिनिधी) :

गुंजाळवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या विश्वगौरव विभूषित परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज हरिनाम सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर निघालेल्या भव्य मिरवणुकीने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. अलोट जनसमुदायाच्या उपस्थितीत झालेल्या या मिरवणुकीने गावातील ऐक्य, एकोपा आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले. गावपण कसे असावे याचा आदर्शच गुंजाळवाडीकरांनी यानिमित्ताने समाजासमोर ठेवला. संगमनेर बस स्थानक दत्त मंदिर ते अकोले नाका अशी भव्य मिरवणूक पार पडली या मिरवणुकीत पारंपारिक वाद्यांनी रंगत आणली तर तरुणांची तरुण मुले मुली यांच्या साहसी खेळाने प्रेक्षकांचे डोळ्यांचे पारणे फीटले अत्यंत शिस्तबद्ध मिरवणुकीने संगमनेरकर मंत्रमुग्ध झाले ठीक ठिकाणी या मिरवणुकीवर फुलांचा वर्षाव करण्यात आला तसेच गगनगिरी महाराज यांच्या मूर्तीची रथातून तसेच सप्ताहासाठी आलेल्या साधू महाराजांची रथांमधून भव्य मिरवणूक काढली महिलांनी साधुसंतांचे पूजन केले यावेळी रथ घोडे सहासी खेळ या मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण होते

मिरवणुकीनंतर झालेल्या सभेत उद्योजक व गगनगिरी महाराजांचे निस्सीम भक्त आबासाहेब थोरात यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “हा हरिनाम सप्ताह म्हणजे केवळ धार्मिक कार्यक्रम नसून आध्यात्मिक उन्नतीचा आणि समाज एकत्र आणण्याचा महोत्सव आहे. हा सप्ताह कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीचा एक भाग असल्यासारखा असून, यातून प्रत्येकाला भक्ती, संस्कार आणि सकारात्मकतेची ऊर्जा मिळणार आहे.”

ते पुढे म्हणाले की, “आजच्या सोशल मीडियाच्या युगात अनावश्यक गोष्टींमध्ये वेळ घालविण्यापेक्षा स्वामी गगनगिरी महाराजांचे विचार, त्यांचे कार्य आणि अध्यात्मिक संदेश आत्मसात करणे गरजेचे आहे. हा सप्ताह म्हणजे विचारांची महापर्वणी असून महाराजांची अद्भुत शक्ती प्रत्येकाला सकारात्मक ऊर्जा, आत्मविश्वास आणि जीवन जगण्याची नवी दिशा देईल.”

सप्ताहाच्या यशस्वी आयोजनासाठी गेले अडीच महिने सुरू असलेल्या तयारीचा उल्लेख करताना आबासाहेब थोरात यांनी गावातील नागरिक, युवक, महिला, ज्येष्ठ मंडळी तसेच तालुकाभरातील भाविकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “गावातून, तालुक्यातून आणि प्रत्येक व्यक्तीच्या मनातून, कृतीतून व सहभागातून या सप्ताहाला मोठे बळ मिळाले आहे. हा सर्वांचा उत्सव असून प्रत्येकाचे योगदान मोलाचे आहे,” असे सांगत त्यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.

गुंजाळवाडीतील हरिनाम सप्ताहामुळे संपूर्ण परिसरात भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक एकात्मतेचे वातावरण निर्माण झाले असून आगामी दिवसांत विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांना भाविकांची मोठी उपस्थिती लाभणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!