शासकीय कामात अडथळा अंभोरेच्या तरुणावर गुन्हा दाखल
ग्रामविकास अधिकाऱ्यास शिवीगाळ व धक्काबुक्की करीत कार्यालयात कोंडले
संगमनेर : लोकवेध live न्यूज
मद्यधुंद अवस्थेमध्ये ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आलेल्या व्यक्तीने ग्रामविकास अधिकाऱ्यास शिवीगाळ व धक्काबुक्की करीत कार्यालयात कोंडले. केबिनचे नुकसान करीत शासकीय कामात अडथळा आणल्याची घटना तालुक्यातील अंभोरे येथे घडली.
अंभोरेगावाचे ग्रामविकास अधिकारी अरुण जेजुरकर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये काम करीत असताना अचानक मद्यधुंद अवस्थेमध्ये विशाल संजय गायकवाड हा इसम कार्यालयात आला. ‘मला आत्ताच्या आता गाय गोठा यादी दाखवा,’ असे तो म्हणाला, यावर ‘तू दारूच्या नशेत आहे. उद्या सकाळी ये, तुला यादी दाखवितो,’ असे ते म्हणाल्याचा गायकवाड याला राग आला. त्याने जेजुरकर यांना शिवीगाळ केली.
शिवीगाळ करू नको’ असे जेजुरकर समजावून सांगत असताना गायकवाड याने जेजुरकर यांची गचांडी पकडून त्यांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. यावेळी कार्यालयात आलेल्या रामनाथ बर्डे व गणेश साळवे यांनी गायकवाड याला कार्यालयाबाहेर आणले. कार्यालयालयात ग्रामविकास अधिकारी जेजुरकर यांना कोंडून घेत कार्यालयास कडी लावली. यानंतर जेजुरकर यांनी गायकवाड याचे चुलते एकनाथ गायकवाड यांना फोन करून बोलावले. त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये येऊन दरवाजाची कडी उघडली व गायकवाड यास सोबत घेऊन गेले.
काही वेळाने गायकवाड पुन्हा रॉड घेऊन आला. ग्रामसेवकाच्या केबिनचा दरवाजा तोडून नुकसान करीत जेजुरकर यांना धमकी दिली. जेजुरकर यांच्या फिर्यादीवरून गायकवाडविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पो. नि. देविदास ढुमणे व सपोनि राहुल सानप पुढील तपास करीत आहेत.
