बनावट सोने तारण घोटाळ्याची मालिका सुरूच; जी.एस महानगर बँकेची ८३ लाखांची फसवणूक
संगमनेर मध्ये गोल्ड व्हॅल्यूअरसह २३ लोकांवर गुन्हा दाखल
संगमनेर : लोकवेध live न्यूज
महाराष्ट्र ग्रामीण बँक,नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक आणि आता जी.एस महानगर बँकेच्या संगमनेर शाखेत बनावट सोने तारण ठेवून बँकेची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. संगमनेर शहरात शाखा असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेची ६८ लाख,नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेची तब्बल सव्वाचार कोटी तर जी.एस महानगर बँकेची ८३ लाखाची फसवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे संगमनेरातील बनावट सोने तारण घोटाळ्याची मालिका सुरूच असल्याचे या घटनेवरून समोर आले आहे, त्यामुळे दिवसेंदिवस बँकांची विश्वासार्हता धोक्यात आली आहे.
मुंबईच्या जी.एस महानगर को-ऑपरेटिव्ह बँकेची संगमनेरात शाखा आहे. या बँकेत खोट्या सोन्याच्या माध्यमातून २३ कर्जदारांनी ८२ लाख ५७ हजार ८३४ रुपयाची फसवणूक केल्याची तक्रार बँकेचे व्यवस्थापक प्रदीप शिंदे यांनी शहर पोलीस ठाण्यात केली,त्यानुसार संगमनेर शहर पोलिसांनी गोल्ड व्हॅल्यूअर जगदीश शहाणे याच्यासह २३ जणाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. विशेष बाब म्हणजे यापूर्वी झालेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक शाखेत झालेल्या बनावट सोने तारण प्रकरणातील काही आरोपी तेच तेच असल्याचे समोर आले आहे. गोल्ड व्हॅल्यूअर जगदीश शहाणे याच्या माध्यमातून यापूर्वी शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या संगमनेर शाखेत सुमारे ६८ लाख,नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संगमनेर शाखेत सुमारे सव्वाचार कोटी रुपयाची फसवणूक झाल्याचे गुन्हे यापूर्वी दखल झालेले आहेत. त्यात आता जी.एस महानगर बँकेच्या बनावट सोने तारण प्रकरणाच्या गुन्ह्याची भर पडली आहे.दरम्यान महानगर बँकेचे व्यवस्थापक प्रदीप शिंदे यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, १ जुलै २०१६ पासून जगदीश शहाणे हा बँकेत गोल्ड व्हॅल्यूअर म्हणून काम पाहत आहे. शहाणे याने सोनेतारण करणाऱ्या कर्जदारांच्या सोन्याची शुद्धता तपासणी करून त्या संदर्भात ते खरे असल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतर बँकेच्या नियमानुसार सोनेतारण कर्ज दिले जाते.कर्जदाराकडे सोने खोटे निघाल्यास त्यास गोल्ड व्हॅल्यूअर आणि कर्जदार जबाबदार असतो, महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संगमनेर शाखात बनावट सोनेतारण कर्ज प्रकरणात जगदीश शहाणे यांच्या विरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती जी.एस महानगर बँकेचे व्यवस्थापक प्रदीप शिंदे यांना माध्यमांमधून आलेल्या बातम्यांद्वारे समजली. त्यामुळे शिंदे यांनी याची माहिती तातडीने बँकेच्या मुख्य शाखेला दिली, बँकेच्या व्यवस्थापनाने गोल्ड व्हॅल्यूअर जगदीश शहाणे यांच्यासह सोने तारण कर्जदारांना नोटीसा पाठवून दागिन्यांची तपासणी करण्यासाठी बँकेत हजर राहण्यास कळवले होते, या तपासणीमध्ये २३ कर्जदारांचे सोने बनावट असल्याचे आढळून आले, त्यामुळे ८२ लाख ५७ हजार ८३४ रुपयाची फसवणूक २३ कर्जदारांनी केल्याचे समोर आले.
