राहीबाई म्हणजे अहमदनगर जिल्ह्याला लाभलेले वरदान-जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ.
कोंभाळणें येथील बीज बँकेला जिल्हाधिकाऱ्यांची भेट.
पिंपळगाव नाकविंदा / प्रतिनिधी -सचिन लगड
देश- विदेशात प्रसिद्ध असलेल्या बायफ संचलित कोंभाळणे येथील पद्मश्री , बीजमाता राहीबाई सोमा पोपेरे यांच्या मार्गदर्शनाने उभ्या राहिलेल्या देशातील पहिल्या देशी बियाणे बँकेला अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी नुकतीच भेट दिली आहे. ग्रामीण भागाचे विशेष आकर्षण आणि आदर असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच आदिवासी भागाचा दौरा केला. त्यांच्या समवेत प्रांत अधिकारी डॉक्टर शशिकांत मंगरुळे हेही उपस्थित होते. देशी बियांच्या संवर्धनासाठी देश आणि विदेशात प्रसिद्ध असलेल्या बीजमाता राहीबाई सोमा पोपेरे यांची भेट घेऊन या विषयाची सविस्तर माहिती यावेळी जिल्हा अधिकाऱ्यांनी घेतली. राहीबाई यांचे पारंपारिक बियाणे संवर्धनातील ज्ञान व अभ्यास बघून त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.राहीबाई पोपेरे यांनी त्यांनी जतन केलेल्या विविध वाणांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना करून दिली. त्यांच्या संग्रही असलेले भाजीपाला बियांचे संच यावेळी त्यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना भेट दिले. राहीबाई करत असलेल्या कार्याचा आढावा यावेळेस जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. अहमदनगर जिल्ह्यातील आदिवासी अतिदुर्गम भागात अशा पद्धतीचे काम उभे राहिल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत या विषयाचे ज्ञान पोहोचले पाहिजे यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी या वेळेस केले. राहीबाई यांनी जतन केलेल्या विविध गावरान वाणांची तंत्रशुद्ध माहिती आपणास प्रेरणा देऊन गेली असे गौरव उद्गार त्यांनी काढले. अहमदनगर जिल्ह्यात काम करताना या ज्ञानाचा उपयोग होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. राहीबाई यांनी जिल्हाधिकारी व प्रांत अधिकारी यांचा यथोचित सत्कार कळसुबाई बियाणे संवर्धन सामाजिक संस्थेच्या वतीने बीज बँकेत केला. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत देशी वाणांचे बियाणे पोहोचवण्याचा मानस राहीबाई यांनी यावेळी व्यक्त केला.
