आता शहरातही बिबट्याचा मुक्त संचार
संगमनेर-जोर्वे रोडवर बिबट्याच्या हल्ल्यात दोन जखमी
संगमनेर : लोकवेध live न्यूज
बुधवारी पहाटे शहरातील संगमनेर महाविद्यालयाच्या गेटवर आढळून आलेल्या बिबट्याची घटना ताजी असतानाच संगमनेर – जोवेॅ रोडवर असणाऱ्या कोल्हेवाडी शिवारातील गायत्री पेट्रोल पंपा नजीक बिबट्याचा थरार दोन दुचाकी स्वरांना पाहायला मिळाला. शुक्रवारी सायंकाळी बिबट्याने दुचाकी वरून प्रवास करणाऱ्या दुचाकी स्वरांना गंभीर जखमी केले. यामध्ये एक पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, शहरातील नवीन नगर रोडवर असणाऱ्या विमल प्लायवूडचे मालक प्रवीण नागरे आणि त्यांचा मित्र फळ विक्रेता निसार सौदागर हे दोघे आपल्या दुचाकीवरून शुक्रवारी सायंकाळी संगमनेर-जोवेॅ रोडने तालुक्यातील कनोली येथे जात होते. प्रवीण नागरे दुचाकी चालवत होते तर निसार सौदागर हे पाठीमागे बसले होते. त्यांची दुचाकी कोल्हेवाडी शिवारात असणाऱ्या गायत्री पेट्रोल पंपा नजीक आली असता शेजारच्या शेतातून बिबट्याने त्यांच्या दुचाकीवर झेप घेतली, प्रसंगावधान राखून प्रवीण नागरे यांनी दुचाकी जोरात पळवली मात्र या गडबडीत दुचाकीवर मागे बसलेल्या निसार सौदागर यांचा पायाचा पंजा बिबट्याच्या तोंडात आला. त्यामुळे सौदागर यांच्या पायाला मोठी जखम झाली आहे. ही घटना घडल्यावर काही वेळातच जोवेॅ कडून संगमनेर कडे दुचाकी वरून जाणाऱ्या महिलेवर हल्ला चढवत बिबट्याने या महिलेला जखमी केल्याची चर्चा असून तिच्या पायाच्या पोटरीला बिबट्याने चावा घेतला असून तिचे पूर्ण नाव समजले नसले तरी बर्डे आडनावाची ही महिला असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
जखमी सौदागर यांच्यावर घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. दरम्यान ग्रामीण भागात बिबट्यांना लपण्यासाठी आवश्यक असणारी ऊस पिके नुकतीच तुटून गेल्याने बिबट्यांना लपण्यासाठी जागा राहिली नाही, त्यामुळे दिवसभर बिबटे लहानसा आडोसा शोधत दिवस काढतात व रात्री मनमोकळेपणाने हिंडत असतात, आणि त्यातून हल्ल्याचे हे प्रकार घडत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे रात्री रस्त्याने जाणे येणे कठीण झाले असून बिबट्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी आता स्थानिकांनी केली आहे.