एसटीची राजहंस दूध टँकरला जोराची धडक ; चार जण जखमी
संगमनेर लोकवेध live न्यूज
ब्रेक फेल झाल्यामुळे एसटी ने समोरून येणाऱ्या राजहंस दुधाच्या वाहनाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात बसमधील चार प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातातील जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
सोमवारी दुपारी सिन्नर पासून तीन-चार किलोमीटर अंतरावर सिन्नर-नाशिक मार्गावर नाशिकच्या दिशेने एल अॅण्ड टी फाट्याजवळ हा अपघात झाला. शहापूर आगाराची एसटी बस क्रमांक एम. एच. 06 एच. 8560 ही 40 प्रवासी घेऊन दुपारी शिर्डीहून शहापूरच्या दिशेने जात असताना एसटी बस चालकाच्या बाजूने ओढली जात असल्याचे बस चालकाच्या निदर्शनास आले. त्यामुळे सिन्नर बस स्थानकात येताच बस चालकाने सिन्नर डेपोतील तांत्रिक कामगारांकडून एसटी बसची दुरुस्ती करून घेतली. त्यानंतर बस पुन्हा शहापूरच्या दिशेने मार्गस्थ झाली.
सिन्नर पासून तीन चार किलोमीटर अंतरावर नाशिकच्या दिशेने जाणारी ही बस एल अॅण्ड टी फाट्याजवळ एका उतारावर येताच पुन्हा एका बाजूला ओढू लागल्याचे बस चालकाच्या लक्षात आले. त्यामुळे उतारावर बस चालकाने ब्रेक लावण्याचाही प्रयत्न केला. मात्र चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने समोरून संगमनेरच्या दिशेने येत असलेल्या राजहंस दूध संघाच्या दुधाच्या वाहनाला बसने जोराची धडक दिली.
सुदैवाने दोन्ही वाहनांचा वेग मर्यादित असल्याने मोठे संकट टळले. मात्र बस मध्ये चालकाशेजारी बसलेल्या एका ज्येष्ठ नागरिकासह आणखी तीन प्रवासी जखमी झाले. अपघात स्थळी नागरिक प्रवाशांनी मदत करत जखमींना रुग्णालयात हलविले. अपघातामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली होती. महामार्ग पोलीस व एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी येत वाहतूक केली.
