स्टोन क्रशर आणि खानपट्टे धारकांचा दंडाचा आकडा 860 कोटींवर

महसूल विभागाची कारवाई सुरू ; तालुक्यातील दगड खानपट्टा धारक आणि खडी क्रशर चालक हादरले

 

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

 

संगमनेर तालुक्यात अवैधरित्या सुरू असणाऱ्या 58 खानपट्टे आणि खडी क्रशरवर आता शिर्डी आणि श्रीरामपूरच्या प्रांतअधिकाऱ्यांनी 765 कोटींचा दंड ठोठावला होता . त्यानंतर आणखी नऊ जणांवर 95 कोटींचा दंड झाला त्यामुळे आता दंडाचा आकडा 860 कोटींवर जाऊन पोहचला आहे. संगमनेर तालुक्यातील अनेक सफेद पोशाखातल्यांचे पितळ उघडे पडल्याचे दिसून आले. माजी महसूलमंत्री यांच्याच मतदारसंघात राज्यातील मोठी कारवाई झाल्याने तालुक्यासह जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले होते. यातील काही लोकांनी हायकोर्टात धाव घेतली असून सगळ्यांकडून शासनाची थकबाकीदार झाल्याने महसूल विभागाकडून सक्तीच्या वसुलीची कारवाई सुरू झाल्याचे प्रभारी तहसीलदार गणेश तळेकर यांनी सांगितले.
संगमनेर तालुक्यात शासनाचा महसूल बुडवून मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिज उत्खनन सुरू होते. तालुक्यातील 57 स्टोन क्रशर आणि खानपट्टे धारकांना तब्बल 765 कोटींचा दंड ठोठावण्यात आला होता. तालुक्यातील दगड खानपट्टा धारक आणि खडी क्रशर चालक यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी शिर्डी आणि श्रीरामपूर च्या उपविभागीय अधिकारी यांची नेमणूक केली होती. याबाबत त्यांची इटीएस द्वारे मोजणी करून ते दोषी आढळले. खानपट्टा आणि खडी क्रशर धारक यांना आपले म्हणणे मांडण्याची संधीही दिली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी भोसले यांनी 11 नोव्हेंबर 2022 रोजी आपला अहवाल सादर केला होता. त्याअनुषंगाने 57 खानपट्टा आणि खडी क्रशर धारक यांना 765 कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. यात आणखी 9 जणांची भर पडली आणि दंडाची रक्कम 860 रुपयांवर जाऊन पोहचली.
या कारवाईला 6 महिने होत आले तरी देखील अजूनर्यंत कोणीही दंडाची रक्कम भरली नाही. तसेच यातील काही लोकांनी हायकोर्टात धाव घेतली. परंतु आता महसूल विभागच ॲक्शन मोड मध्ये आले असून त्या गौण खनिजाची चोरी करणाऱ्यांना नोटिसा पाठवून सक्तीच्या वसुलीची कारवाई सुरू केली आहे.
तालुक्यातील कवठे कमलेश्वर, मेंढवन, मेंगाळवाडी, नांदुरी दुमाला, करुले, कोकणगाव, कर्जुले पठार, खंदरमाळ वाडी, डोळसने, साकुर, मांची, पिंपळे, कसारे, बाळापूर, कर्हे, पारेगाव खु, कोळवाडे, तळेगाव दिघे, पिंपरने, वडझरी खु, अंभोरे, येलखोपडी यांसह इतर गावात खानपट्टा आणि खडी क्रशर सुरू होते. या सर्वांना नोटिसा बजवण्यात आल्या असल्याचे प्रभारी तहसीलदार तळेकर यांनी सांगितले.

शासनाची थकबाकीदार झाल्याने जमीन महसूलची थकबाकी समजून शक्तीच्या वसुलीची कारवाई सुरू झाली आहे. अद्याप पर्यंत दंड न भरल्याने नियमाप्रमाणे पुढील कारवाई करण्यात आली आहे
गणेश तळेकर, प्रभारी तहसीलदार, संगमनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!