निळवंडेचे जनक आ.थोरात यांच्या पत्राची दखल ; सरकारकडून तातडीने पाणी सोडण्याची चाचणी
धरण व कालव्यांमध्ये कोणाचे योगदान हे जनतेला माहीत – आमदार थोरात
संगमनेर / लोकवेध live न्यूज

जीवनाचे ध्यासपर्व मानून निळवंडे धरण आपण पूर्ण केले. अनेक अडचणीवर मात करून कालव्यांची कामे मार्गी लावली. रात्रंदिवस काम सुरू ठेवून ऑक्टोबर 2022 मध्येच दुष्काळी भागाला पाणी द्यायचे होते. सरकार बदलले त्यामुळे कामे मंदावली. मात्र आता दहा टीएमसी पाणी शिल्लक असताना श्रेयवादासाठी उशीर न करता तातडीने पाणी सोडले पाहिजे. धरणाचे काम कोणी केले हे सर्वांना माहीत असून नशिबाने तुम्हाला संधी मिळाली आहे तर पाणी सोडण्यास उशीर का केला ? असा सवाल निळवंडे धरणाचे जनक काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केला असून आमदार थोरात यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना दिलेल्या पत्रामुळे सरकारने तातडीने पाणी सोडण्याची चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
याचबरोबर नवीन संसद भवनाच्या उद्घाटनासाठी देशातील सर्वोच्च पद असलेल्या राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन हे सर्व पक्षांना बरोबर घेऊन झाले असते तर तो आनंदाचा क्षण ठरला असता. परंतु महत्त्वकांक्षेमुळे राष्ट्रपती या सर्वोच्च पदाला सन्मान न देता उद्घाटन झाले आहे. यामुळे याची इतिहासात चांगली नोंद होणार नाही. याचबरोबर 2000 च्या नोटा जेव्हा सुरू केल्या त्यावेळेस अर्थ तज्ञांचा विरोध होता. घाईघाईने घेतलेल्या तो निर्णय होता. त्याची मंत्रिमंडळाला सुद्धा माहिती नव्हती. या निर्णयामुळे जनतेचे मोठे हाल झाले. अर्थव्यवस्थेमध्ये असे स्थित्यंतरे योग्य नसल्याचे ही आमदार थोरात यांनी म्हटले आहे.
आमदार थोरात यांच्या पत्रामुळे सरकारने घेतला तातडीने निर्णय
निळवंडे धरणाचे जनक व मा महसूल मंत्री काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे धरणातून पाणी सोडावे या मागणीचे पत्र 23 मे 23 रोजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना दिले होते. दुष्काळग्रस्त भागासाठी सातत्याने निळवंडे धरणाच्या व कालव्यांच्या कामासाठी आग्रही असणाऱ्या आमदार थोरात यांच्या पत्राची दखल घेत तातडीने पुढील आठवड्यामध्ये पाणी सोडण्याची चाचणी घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
