बालमजुरी थांबणार कधी ?
बालमजुरीचे सर्वात मोठे कारण आहे दारिद्रय व त्यामुळे निर्माण झालेली निरक्षरता.
लोकवेध live न्यूज
बालपण आयुष्यातील सर्वात सुंदर काळ. बालपण ही माणसाला मिळालेली ईश्वराची सर्वात अमूल्य देणगी आहे असे म्हणतात. कोणत्याही गोष्टीची न काही जबाबदारी न काही चिंता. फक्त खेळण-बागडण, दंगा मस्ती करणं आणि अभ्यास. मात्र अशा प्रकारचे बालपण प्रत्येकाच्याच वाटयाला येत असं नाही. एखाद्या हॉटेल मध्ये, घरामध्ये, दुकानात किंवा विटभट्टीवर एखादा बालक ज्याच्या हातात पुस्तके असण्याऐवजी साफसफाई करण्यासाठी झाडू, फडके किंवा अवजारे असलेली दिसतात ज्याला आपण बालमजुर असे म्हणतो.
जर कोणी १४ वर्षे वयाखालील बालक उपजिविकेसाठी काम करित असेल तर त्याला बालमजुर असे म्हणतात. आज जगात २१५ दशलक्ष बालमजुर आहेत. भारताच्या बाबतीत तर बालमजुरीचा प्रश्न खूप भयानक आहे. जगात सर्वात जास्त बालमजुर भारतात आहेत. १९९७ च्या जनगणनेनूसार भारतात ११.३ दशलक्ष बालमजुर होते तर २००१ च्या जनगणनेत यात आणखीन वाढ होवून बालमजुरांची संख्या १२.७ दशलक्ष झाली. २०१५ मध्ये यात आणखीन वाढ होवून २५ दशलक्ष झाली म्हणजेच बालमजुरांचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढतच चालले आहे. हा एक चिंतेचा विषय आहे.
मोठया शहरातच काय एखाद्या छोट्या शहरात ही प्रत्येक गल्ली-बोळात तुम्हाला चिंटू, पिंटू, बबली दिसतील जे परिस्थिती मुळे हतबल होवून बालमजुरीच्या जाळ्यात अडकले आहेत. यांना बालमजुर म्हणून फक्त शारीरिक कष्टाचीच कामे करावी लागत नाहीत तर कधी-कधी या पैकी अनेक बालकांचा भावनिक, शारीरिक व लैंगिक छळ केला जातो. त्यांना मालकाकडून सिगारेटचे चटके देणे, मारहाण करणे असे प्रकार केले जातात. हे सर्व त्यांना मुकाट्याने सहन करावे लागते. अशी अनेक प्रकरणे प्रसार माध्यमांतून समोर आली आहेत. इथे बालपण कोमेजले जात आहे.
बालमजुरीचे सर्वात मोठे कारण आहे दारिद्रय व त्यामुळे निर्माण झालेली निरक्षरता. आज देशात करोडो लोक अशी आहेत ज्यांना दोन वेळेची भाकरही दिवसभर कष्ट केल्यानंतरही सहजरित्या मिळत नाही. यातील बहुतांश लोक मोल-मजुरीची कामे करतात. त्यांच्या निरक्षरतेमुळे त्यांचे कुटुंब ही मोठे असते. अशा परिस्थितीत जिथे स्वत:चे पोट भरणे मुश्किल आहे तिथे ते स्वत:च्या मुलांचे संगोपन निट करु शकत नाहीत, त्यांना योग्य शिक्षण देवू शकत नाहीत. परिस्थिती ज्या वेळेस खूप कठीण होते तेंव्हा त्यांना आपल्या लहान मुलांना काही ना काही रोजगारात लावावे लागते. अशाप्रकारे बाल्यावस्थेतच या मुलांना शारीरिक कष्टाच्या कामाला जुंपल्याने त्यांचा जो नैसर्गिक विकास व्हायला हवा तो होत नाही उलट त्यांच्या मध्ये आत्मविश्वासाचा अभाव निर्माण होतो.
बालमजुरी करणा-यांमध्ये वय वर्षे ५ ते १४ वर्षा पर्यंतची बालके आहेत. यात मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण जास्त आहे. उत्तर प्रदेश, प.बंगाल, मध्य प्रदेश, ओरिसा, मेघालय या राज्यात बालमजुरीचे प्रमाण जास्त असलेले दिसून येते. अनेक सामाजिक संस्था समाजात पसरलेल्या या वाईट गोष्टीला नष्ट करण्याचा प्रयत्न करित आहेत. देशातील बालमजुरी नष्ट करण्यासाठी काम करणा-या सत्यार्थ प्रकाश यांना नोबेल पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. यासाठी काम करणा-या सामाजिक संस्था अनूसार देशातील बालमजुरांपैकी ५३.२२ टक्के बालके लैंगिक अत्याचाराची बळी पडतात. ५०.२२ टक्के बालके अशी आहेत की आठवड्यातील सात ही दिवस काम करतात. तर ५० टक्के बालमजुर शारीरिक अत्याचाराला बळी पडतात.
एकीकडे बालकांचा मोठा समुह पंचतारांकीत हॉटेल मधील दर्जेदार पंचपक्वानाचा आनंद घेतो तर दूसरीकडे अनाथ व गरीब बालके अशी आहेत की त्यांना उपासमारीला तोंड द्यावे लागते, दोन वेळेसचे पोटभर अन्न मिळत नसल्यामूळे दूस-यांनी टाकून दिलेल्या उष्ट्या अन्नावर त्यांना आपली उपजिविका भागवावी लागते. हा समाजातला विरोधा भास आहे. बालमजुरी करणारी मुले आर्थिक विवंचने अभावी शिक्षण घेवू शकत नाहीत. बालमजुरी करणा-या बालकांचे भविष्य अंधकारमय आहे, त्यांचे सर्वात जास्त शोषण होत आहे.
बालमजुरी रोखण्यासाठी केंद्र सरकारने १९८६ मध्ये बालमजुरी प्रतीबंधक कायदा केला. या अंतर्गत एखाद्या बालकाकडून बालमजुरी करुन घेणे हे मानव अधिकाराचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. ३० जुलै २०१६ ला सरकारने या कायद्यात आणखीन काही सुधारणा केल्या आहेत. यात बालमजुरी करून घेणा-यास कमीत कमी ६ महिन्यांची शिक्षा व २०,००० ते ५०,००० दंड ठोठावण्याची तरतूद आहे. सरकारने शिक्षणाच्या बाल हक्क कायद्याअंतर्गत इ. ८ वी पर्यंतचे शिक्षण मोफत व सक्तीचे करुनही अनेक मुले शाळाबाह्य आढळुन आली आहेत. ही शाळाबाह्य मुले दूसरी तिसरी कोणी नसून बालमजुर आहेत. हे स्वत: अशिक्षीत राहिल्याने त्यांच्या पूढील पिढयान-पिढया बालमजुरच तयार होतील. देशातील वाढत्या बालमजुरांच्या संख्येवर वेळेवर जर नियंत्रण मिळवले नाही तर याचे खूप दूरगामी वाईट परिणाम देशावर होतील.
सरकारने बालमजुरी रोखण्यासाठी कायदा केला आहे. त्यामुळे जर कोणी बालकाने आपले पोट भरण्यासाठी रोजगारी मागण्याचा प्रयत्न केला तर त्याला कायद्याचा हवाला देवून कोणी काम देत नाही. मग या मुलांनी करायचे तरी काय ? कुणाकडे जावे जेणे करुन त्यांच्या या समस्येचे समाधान मिळू शकेल. सरकारने बालमजुरी रोखण्यासाठी कायदा तर केला पण यांच्या समस्येकडे कधी गंभीरतेने बघितलयं ? बालमजुरीला मुळापासून नष्ट करण्यासाठी अगोदर गरीबीला नष्ट करावे लागेल. सरकारने अशा काही योजना राबवायला पाहिजेत जेणेकरून लोकांचा आर्थिक स्तर उंचावेल व त्यांना आपल्या मुलांना बालमजुरी करण्यासाठी विवश करावे लागणार नाही. या बालकांना दोन वेळेसचे अन्न मिळण्याची सोय झाली पाहिजे. या कामी प्रशासकीय, सामाजिक व व्यक्तीगत सर्व स्तरांवर प्रयत्न झाले पाहिजेत. व्यक्तीगत स्तरावर बालमजुरीचा विरोध करणे हा आपल्या नैतिकतेचा भाग आहे. आपण याचा विरोध करण्यासाठी सतत पुढे आले पाहिजे.
आशा आहे की, देशातील या संबंधीत कायदे आणखीन कडक होतील, राष्ट्रीय स्तरावर अशी व्यवस्था जन्म घेईल ज्यामुळे पुन्हा कोणत्याही बालकाला बालमजुरी करावी लागणार नाही. त्यांचे बालपण हरवणार नाही. ते चांगल्या प्रकारे शिक्षण घेवून देशाला गौरव प्राप्त करून देतील. त्यांच्या भविष्यावर पुन्हा प्रश्न चिन्ह उभा टाकणार नाही.
–
सुरेश मंत्री, अंबाजोगाई.
संपर्क – ९४०३६५०७२२
