अंजनेरी ब्रह्मगिरी रोपवे झाला तर राष्ट्रपती पुरस्कार परत करेन  राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त श्री शंकर बाबा शिंदे यांची आज अंजनेरी येथे घोषणा

 

नाशिक / लोकवेध live न्यूज निलेश शेकोकार

 

जटायूंचा अधिवास,अंजनेरीची जैवविविधता,ब्रह्मगिरीची पवित्रता अबाधित राखण्यासाठी प्रस्तावित अंजनेरी ब्रह्मगिरी रोपवेला नाशिक त्रंबकेश्वर मधील सर्व पर्यावरण संस्थांचा विरोध सुरू आहे. नुकतीच याबाबत पर्यावरण प्रेमींनी वनमंत्र्यांची भेट घेतली. नाशिक जिल्हाधिकारी यांना याबाबत सर्वांची बैठक बोलावून अहवाल वनमंत्र्यांना सादर करण्याचे आदेश दस्तुरखुद्द वनमंत्र्यांनी दिलेले आहेत. ब्रह्मगिरी मेटघर ग्रामस्थांनी या आधीच रोपवे विरोधात ठराव करून या रोपवेस विरोध दर्शविलेला आहे.गडदुर्ग संवर्धनात काम करणाऱ्या शासन नियुक्त समित्यांनीही ठराव करून या रोपवेस उघड उघड विरोध दर्शविला हे विशेष.नाशिक येथील पर्यावरण प्रेमींनी जटायू गिधाड पक्षाचे महत्त्व विशद करण्यासाठी अंजनेरी येथे सफर जटायूंची हा उपक्रम आज आयोजित केला होता.या उपक्रमास प्रतिसाद देत खोरीपाडा येथील जैवविविधता व गिधाड संवर्धनासाठी प्रसिद्ध राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त श्री शंकर बाबा शिंदे यांनी सर्व उपस्थित ग्रामस्थ,पर्यावरण प्रेमींना मार्गदर्शन केले. अंजनेरी पर्वताची दुर्मिळ जैवविविधता व येथील जटायू पक्षांचा अधिवास अंजनेरीसाठी,अंजनेरीच्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे असे यावेळी शिंदे यांनी सांगितले. आयुर्वेदिक दुर्मिळ औषधी वनस्पती संवर्धनासाठी जटायू पक्षांच्या सेवेसाठी आम्हाला शासनाकडून राष्ट्रपती पुरस्कार दिला जात असतांना त्यांनाच रोपवे रुपी विकासाने उध्वस्त केले जात असेल तर अशा पुरस्कारांची गरज काय असे पुरस्कार परत करणेच योग्य ठरेल असे मत याप्रसंगी श्री शिंदे यांनी व्यक्त करून शासनास हा प्रकल्प इतरत्र सुरू करण्याचे आवाहन केले. देशभरातील जटायूंच्या प्रजननासाठी हा परिसर अत्यंत उपयुक्त असून अत्यंत दुर्मिळ वनस्पतींसाठी हा भाग जगविख्यात असताना येथे पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करण्याऐवजी दुर्मिळ वनस्पती व जटायूंचे संवर्धन करण्यासाठी शासनाने प्रयत्न करणे जास्त गरजेचे आहे असे शंकर बाबा म्हटले. शंकरबाबांचा परिचय करून देतांना जेष्ठ पर्यावरण प्रेमी रमेश अय्यर यांनी बाबांच्या जटायू संवर्धनाच्या कामाची प्रशंसा करून सर्व पर्यावरण प्रमींनी आयुर्वेदिक वनस्पतींची आरोग्य विषयक उपयुक्तता लक्षात घेवून शिंदे बाबांकडून वनस्पती पर्यावरण अभ्यासाबाबत मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे असे नमूद करून सफर जटायूंची या उपक्रमाची सुरवात केली.यावेळी या भागातील ज्येष्ठ कवी पत्रकार पर्यावरण प्रेमी देवचंद महाले यांनी आपली संस्कृती पर्यावरण वाचविण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे असे आवाहन केले. गावातील ज्येष्ठ हनुमंत भक्त श्री शंकर बाबांच्या उपस्तिथीत अरविंद निकुंभ यांनी ग्रामस्थांना रोपवे हटाव अंजनेरी ब्रह्मगिरी बचाव मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले असता येथील ग्रामस्थांनी लवकरच आम्ही रोपवे विरोधात ठराव करणार आहोत असे सांगितले. युवा वन्यजीव अभ्यासक जयेश पाटील यांनी अन्नसाखळीतील गिधाडांचे महत्त्व विशद करून या भागातील गिधाड नष्ट झाल्यास ग्रामस्थांना रोगराईस सामोरे जावे लागेल अशी भीती व्यक्त केली. रायगड येथील रोपवे हा गिधाड नष्ट करणारे उत्तम उदाहरण ठरत असतांना अंजनेरी ब्रह्मगिरी येथील रोपवे बाबत सरकारने पुनर्विचार करणे गरजेचे आहे असे पाटील यांनी सांगितले.अतिदुर्मिळ जैवविविधतेने संपन्न भागात रोपवेची गरज नसतांना जनतेचा पैसा ग्रामस्थांच्या मूलभूत सोयीसुविधांसाठी खर्च करण्यासाठी जनसेवकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे गरुड झेप प्रतिष्ठानचे डॉ संदीप भानोसे यांनी सांगितले. सर्वाधीक पावसासाठी प्रसिद्ध त्रंबकभागातील आदिवासी बांधव उन्हाळ्यात विहिरीत उतरून पाणी भरतांना,कुपोषणाने बालक मरतांना,विजेपासून आरोग्य सुविधां पासून वंचित भागात 400 ते 600 करोड रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या अनावश्यक रोपवे ऐवजी येथील निसर्ग संपदेने श्रीमंत ग्रामसभांना 100 कोटी रुपये सरकारने मूलभूत सोईसुविधांचा विकास करण्यासाठी देणे अधिक गरजेचे आहे असे याभागात सामाजिक काम करणाऱ्या शहाजी यांनी सांगितले. बदलते हवामान लक्षात घेता शेतकऱ्यांसाठी येथील बोडक्या डोंगराचे जैवविविधतेने संपन्न भारतीय वृक्षराजीने हरितीकरण करण्याची नितांत गरज असल्याचे पर्यावरण अभ्यासक तुषार पिंगळे यांनी सर्वांच्या लक्षात आणून दिले.सहजतेने एक ते दीड तासात डोंगर चढला जात असतांना पायी डोंगर चढण्याचा आनंद व परंपरा मोडीत काढून येथील वन्यजीवांचा अधिवास धोक्यात घालून येथे रोपवे करण्याची गरज नसून प्रयागराजच्या धर्तीवर शहरातील वाहतूक समस्या निवारण्यासाठी रोपवे वाहतूक तंत्रज्ञानाचा उपयोग करणे संयुक्तिक ठरेल असाही विचार येथील निसर्गाचा आनंद लुटण्यास आलेल्या पर्यटकांनी व्यक्त केला. उगमस्थानी त्रंबकेश्वर मध्ये माता गोदावरी गटारात त्या प्रकारे रामायणातील श्रीराम भक्त हनुमान मीत्र जटायूंचे आद्य स्थान धोक्यात घालून विकास साधने चुकीचे ठरेल असा विकास गोदा प्रेमींना मान्य नसून गोदेच्या बरोबर जटायूंच्या साथीने अंजेरीचा विकासच खरा शाश्वत विकास ठरेल अशी भावना सोमा कुऱ्हाडे यांनी व्यक्त केली. सर्वव्यापी अतुलित बलधारी ज्ञानगुणसागर प्रभू हनुमंत रायाला तथाकथित भक्त अंजनेरी किल्यावरील सिमेंटच्या मंदिरात सीमित करून अंजनेरी उद्धवस्त करणारे अंजनेरी गडाच्या विकासाचे स्वप्न बघणे चुकीचे असून संपूर्ण अंजनेरी डोंगरच हनुमंत रायाचे मंदिर स्वरूप असून अंजनेरी डोंगराची भक्ती भावाने पूजन करणे खऱ्या भक्ताचे लक्षण असे मत मनीष बाविस्कर यांनी मांडले. मेटघर ग्रामस्थांचा, पर्यावरण प्रेमींचा व अभ्यासकांचा विरोध लक्षात घेता जैवविविधता,जटायूंचा अधिवास अबाधित राखण्यासाठी येथील रोपवे बाबत सरकारने पुनर्विचार करणे गरजेचे ठरत आहे असे सांगून प्रसंगी तीव्र आंदोलन करण्याचे सूतोवाच जगबीर सिंग यांनी दिलेत. आजच्या या जटायू सफर कार्यक्रमाची सांगता करतांना देशातील भाविक,भक्त,पर्यटकांनी येथील अती दुर्मिळ जैवविविधता व जटायूंचा अधिवास जपण्यासाठी येथील प्रस्तावित रोपवे सफारीचा त्याग करण्याचा संकल्प करून जटायू रक्षणाचा संदेश सरकार पर्यंत पोहचविण्याचे आवाहन रमेश अय्यर यांनी देशवासियांना केले.
पर्यावरण प्रेमींनी आयोजित केलेल्या आजच्या या जटायू साफरारीत प्रमुख पाहुणे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शंकर बाबा शिंदे,पर्यावरण प्रेमी,कवी देवचंद महाले,गरुड झेप प्रतिष्ठानचे डॉ.संदीप भानोसे,अरविंद निकुंभ,हिरवांकुरचे नीलाय बाबू शहा,गिव्ह संस्थेचे रमेश अय्यर, मनीष बाविस्कर,तुषार पिंगळे, वन्यजीव सामाजिक संस्था जयेश पाटील, मानव उत्थान मंचचे जगबिर सिंग,तुषार गायकवाड,गणेश चव्हाण,हेमंत कोलते,आदीत्ये केदारे,दीपक महाजन,ऋषीकेश तिवडे,दत्ता देशमाने संकेत शेलार,विशाल बाफना, सोमा कुऱ्हाडे,राह फौंडेशनच्या शरयू कामत,गोदावरी ताई,वैशाली कुऱ्हाडे इ. व अनेक संस्था प्रतिनिधी, ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!