दीप:ज्योती नमोस्तुते ,

गटारी अमावस्या नव्हे ; भारतीय संस्कृतीमध्ये या अमावस्येला दीप अमावस्या संबोधतात – प्रा मुकुंदजी डांगे

 

लोकवेध live न्यूज

 

आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजेच अमावस्या. भारतीय संस्कृतीमध्ये या अमावस्येला दीप अमावस्या असे संबोधले जाते.
घराघरातील दिव्यांची स्वच्छता करून त्यांचे पूजन करणे अशी परंपरा या दिवशी आहे.खरोखर या परंपरे मागील अर्थ फार महत्त्वाचा आहे. विजेचा शोध लागून विजेचे दिवे म्हणजेच बल्ब तयार होण्यापूर्वी घराघरातच नव्हे तर चौका चौकातही तेलापासून बनविलेले दिवे लावले जात असत. दिवा हा उजेड देणारा ,परिसर प्रकाशमान करणारा आहे. या उजेडातच आपल्याला वस्तू दिसतात. म्हणजेच नवी दृष्टी जणू प्राप्त होते. अंधारावर मात करणारा प्रकाश आणि हा प्रकाश देणारा दिवा म्हणून दिव्याचे महत्त्व फार मोठे आहे. या दिव्या विषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्याचे पूजन या दिवशी केले जाते. तेही अमावस्येच्या म्हणजेच पूर्ण अंधाऱ्या रात्रीचा दिवस त्यासाठी निवडलेला आहे.किती महान अर्थ असलेली ही परंपरा आहे.
अंधार म्हणजेच प्रकाशाचा अभाव. जिथे जिथे ज्ञानाचा अभाव आहे तिथेही असाच अज्ञानाचा, अंधश्रद्धेचा जनुअंधारच पसरलेला असतो. म्हणूनच या तिमिराकडून तेजाकडे जाताना दिवा आपली साथ करतो. *तमसो मा ज्योतिर्गमय,असतो मा सद्गगमय.* ही आपली संस्कृती आहे. या अंधश्रद्धेचा अज्ञानाचा नाश करण्यासाठी आपल्याला ज्ञानाचा दिवा प्रकाशमान करायला हवा.
*प्रज्वलतो ज्ञानमय प्रदीप:*
अलीकडे काही वर्षांपासून आषाढी अमावस्या म्हणजेच श्रावणापूर्वी येणारी अमावस्या वेगळ्या अर्थाने प्रसिद्ध नव्हे कुप्रसिद्ध होत आहे.श्रावणामध्ये देव देवतांचे पूजन, आध्यात्मिक कार्य करायचे .सात्विक आहार घ्यायचा. म्हणून त्यापूर्वी आषाढ महिन्यात मात्र तामसाहार, मांसाहार आणि त्याला जोडीला मद्य प्राशन म्हणजेच दारूचा अतिरेक करायचा.या अतिरेकामुळे आपण माणूस आहोत याचं भान विसरून जणू गटारात जाऊन पडावे अशी अवस्था. म्हणजेच गटारी अमावस्या. असा प्रघात पडू पाहतो आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी की ती सुद्धा आता साजरी होऊ लागली आहे .आणि जणू हे करावेच लागते अशी प्रथा रूढ होते आहे. माझा एक जवळचा मित्र जुबेर आज मला म्हणाला एखाद्या व्रताप्रमाणे एखाद्या देवतेच्या पूजनाचा जसा प्रघात वर्षानुवर्ष चालू असतो तसे काहीसे या गटारी अमावस्येला मांसाहार व दारू पिणे जणू अनिवार्यच आहे अशी परिस्थिती समाजात निर्माण होते आहे. ही खूप मोठी घातक गोष्ट आहे. खरोखर त्याचे हे विचार आपल्या सर्वांनाच चिंतन करण्यासारखे आहे. वाढत्या व्यसनाधीनतेविषयी समाजाचा हा समज जणू विचारांचा,ज्ञानाचा अंधारच आहे. तो दूर करण्यासाठी आषाढी अमावस्या ही दीप अमावस्या म्हणूनच भारतीय संस्कृतीने पुढे आणली होती. तिला पुन्हा एकदा व्यापक स्वरूप घराघरांमध्ये,शैक्षणिक संस्थांमध्ये, सेवाभावी संस्थांमध्ये देणे अत्यावश्यक बनले आहे. अन्यथा तरुण पिढी व्यसनाधीनतेच्या अंधकारांमध्ये बुडेल. आणि म्हणूनच परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालयामध्ये आषाढी अमावस्येला दिव्यांचे प्रदर्शन भरविले जाते. विद्यार्थ्यांना *स्वयं दीप भव.* हा संदेश दिला जातो. या निमित्ताने विद्यार्थी आपल्या घरातील जुने थोडे अडगळीला पडलेले, तांब्या पितळेची दिवे बाहेर काढतात, ते स्वच्छ करतात. अगदी दगडाचे, लाकडाचे,काचेचे विविध आकारांचे दिवे या प्रदर्शनात मांडले जातात. यातून महान परंपरेचा, संस्कृतीचा भाग विद्यार्थ्यांना तर समजतोच पण त्याचबरोबर भाषा, कला ,कार्यानुभव या विषयातील अनेक मूल्यांपर्यंत जाऊन पोहोचता येते.

प्राचार्य मुकुंदजी डांगे

परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पिंपरणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!