महाराष्ट्र राज्याचे माजी सचिव,निमगाव जाळीचे मार्गदर्शक व भावी पिढीचे दीपस्तंभ मा.शिवाजीराव जोंधळेसाहेब
लोकवेध live न्यूज / अशोक गोसावी
……कर्तबगार व शूरवीरांची ऐतिहासिक भूमी म्हणून निमगाव जाळीचा उल्लेख नेहमीच होतो अशा या पेशवेकालीन व शिक्षणांने समृद्ध असलेल्या निमगाव जाळी ता.संगमनेर या खेडेगावात मातोश्री सत्यभामाबाई व पिताश्री राणुजी यांच्या पोटी शिवाजीरावांचा निमगाव जाळी येथे 17 जुलै 1960 रोजी जन्म झाला.कधीकधी गावामुळे कुणाला महत्व प्राप्त होते परंतु येथे तर शिवाजीरावांमुळे गावालाच महत्त्व प्राप्त झाले. दुष्काळ सदृश ग्रामीण भागातील जेमतेम परिस्थिती असलेल्या कुटुंबातून जन्म घेतलेल्या शिवाजीरावांनी आपल्या हुशारीने व कर्तबदारीने स्वतःचेच नव्हे तर गावाचेही नाव उभ्या महाराष्ट्रात उज्वल केले. आपले प्राथमिक शिक्षण त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमगाव जाळी येथे पूर्ण करून ज्ञानमाता विद्यालय,संगमनेर येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.कृषी महाविद्यालय पुणे येथे कृषी पदवी प्राप्त केली. त्यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे एम एस सी ऍग्री शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली एम.पी.एस.सी परीक्षेच्या माध्यमातून 1984 ला जिल्हा निरीक्षक भूमि अभिलेख पुणे या पदावर काम करून त्यांनी आपल्या सेवेचा प्रारंभ केला त्यानंतर 1985 ते 87 मुंबई येथे वित्त लेखा सेवा वर्ग एक म्हणून काम केले. 1987 ला उपजिल्हाधिकारी म्हणून नाशिक येथे प्रशासकीय कामाचा ठसा उमटवला 1990 ते 93अमळनेर येथे उपजिल्हाधिकारी व प्रांत अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. प्रशासनातील अत्यंत कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांचा थोड्या दिवसात नावलौकिक झाला 1993 ते 95 निफाड जिल्हा नाशिक येथे त्यांनी प्रांत अधिकारी म्हणून आपली सेवा बजावली 1997 ते 99 आपल्या कर्तबदारीने त्यांनी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे खाजगी सचिव म्हणून काम पाहिले 2001 ते 2004 या दरम्यान ते केंद्रीय अर्थमंत्री राज्यमंत्री पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांचे खाजगी सचिव म्हणून तसेच कार्यालय अधीक्षक म्हणून त्यांनी नवी दिल्ली येथे आपली जबाबदारी पार पाडली 2004 ते 5 ला कोकण विभाग उपायुक्त म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला. सिडको मुंबई चे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले 2006 ते 8 कोकण,मुंबई नाशिक धुळे विभागाचे जात पडताळणी विभागाचे अध्यक्ष म्हणून यशस्वी काम केले. 2009 ते 2011 मध्ये विधी व न्याय खात्याचे मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे खाजगी सचिव म्हणून पुनश्च काम केले. 2016 मध्ये त्यांच्या प्रशासकीय कामाची दखल घेऊन महाराष्ट्र राज्याची उपराजधानी नागपूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. 2018 मध्ये जालना जिल्हाधिकारी म्हणून त्यांच्या कार्याचा खऱ्या अर्थाने गौरव झाला. प्रधानमंत्री पीक योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जालना जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांना प्रधानमंत्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर 2020 पर्यंत त्यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी म्हणून काम केले, 2020 मध्ये त्यांची राज्यांच्या अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या सामान्य प्रशासन विभागाचे महाराष्ट्र राज्याचे सचिव म्हणून त्यांनी आपली जबाबदारी अत्यंत उत्तमपणे पार पडली तदनंतर नियतकालमानानुसार 31 जुलै 2020 रोजी ते आपल्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले.आपल्या संपूर्ण सेवाकालातही त्यांनी आपल्या जन्मभूमीकडे कधीही दुर्लक्ष केलेले नाही गोरगरिबापासून ते दिनदलीतापर्यंत त्यांनी आपल्या परीने जन्मभूमीची अविरत सेवा केली.यासाठी त्यांनी राजे शिवाजी बहुउद्देशीय प्रतिष्ठान व राजे शिवाजी ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेची निर्मिती करून समाजसेवेचे व्रत अखंडपणे चालू ठेवले मातापीत्या कडून मिळालेला समाजसेवेचा वारसा त्यांनी जतन करण्याचा जणू विडाच उचलला.सामाजिक कार्याचा ध्यास घेतलेल्या शिवाजीरावांनी आपला प्रत्येक क्षण गावाच्या विकासासाठी समर्पित केलाआहे.आजही ते गावातील प्रत्येक सामाजिक कार्यात सहभागी असतात.राजे शिवाजी
बहुउद्देशीय प्रतिष्ठान व राजे शिवाजी ग्रामीण पतसंस्था या माध्यमातून व गावातील विविध संस्थांच्या माध्यमातून गावाच्या विकासाची धुरा आज त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली.या सर्व कामात त्यांना त्यांच्या धर्मपत्नी सौ सुवर्णाताई 1987 पासून सावलीप्रमाणे त्यांच्या बरोबर आहेत मुलगा रितेश 2012 पासूनच अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे वित्त कंपनीत सेवा करतो आहे दुसरा चिरंजीव राकेश अमेरिकेतून नुकताच मायदेशी येऊन तंत्रज्ञान आधारित व्यवसाय व शेती करत आहे. कुटुंबीयांबरोबरच साहेबांना आपल्या बालमित्रांचेही मोलाचे सहकार्य नेहमीच लाभले मित्रपरिवार हा साहेबांचा प्राण की श्वास आहे. शिवाजीराव हे घराघरात लहान थोरापासून सर्वांपर्यंत साहेब या नावाने ओळखले जातात. सामान्यांमध्ये मिसळणे त्यांच्या सुखदुःखाशी समरस होणे व मोठेपणाचा कोणताही बडेजाव न ठेवता समाजात वावरणे ही त्यांची ख्याती आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान अशा या कर्तबगार पुरुषाचा 17 जुलै रोजी वाढदिवस. त्यांच्या या वाढदिवसानिमित्त राजे परिवार व निमगाव जाळी ग्रामस्थांच्या वतीने त्यांना भावी आयुष्यासाठी अनंत अशा मंगलमय शुभेच्छा…
संकलन-पत्रकार अशोक गोसावी निमगाव जाळी ता.संगमनेर
