सर्व पक्षांना धक्का देत माजी आ. भानुदास मुरकुटेंचा ‘बीआरएस’मध्ये जाहीर प्रवेश
मुरकुटेंच्या प्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण बदलण्याची चिन्ह दिसत आहे
श्रीरामपूर / लोकवेध live न्यूज
सहकाराच्या नगर जिल्ह्यात तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांना मोठा राजकीय नेता हाताला लागला असून गेल्या अनेक दिवसांपासून बीआरएस प्रवेशाच्या चर्चेत असलेले श्रीरामपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आणि जिल्ह्यातील सहकारतील मोठे नाव भानुदास मुरकुटे यांनी शंभरहून अधिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला.
मुरकुटेंच्या प्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. प्रवेशावेळी बीआरएसचे नेते माजी आमदार अण्णासाहेब माने, महाराष्ट्र किसान सेलचे अध्यक्ष माणिकराव कदम, पुणे विभाग समन्वयक बी.जे.देशमुख, ज्येष्ठ नेते दशरथ सावंत, घनश्याम शेलार, अब्दुल कादीर मौलाना, बंजारा समाजाचे नेते प्रल्हाद राठोड, आमदार जीवन रेड्डी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. अशोक बँकेचे अध्यक्ष अॅड.सुभाष चौधरी, अशोक कारखान्याचे उपाध्यक्ष पुंजाहरी शिंदे, लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिंमतराव धुमाळ आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते असे तब्बल ११६ जणांचे शिष्टमंडळ तेलंगणाला दोन दिवसांपूर्वी गेले होते.
