गोंधळलेले राजकीय नेते आणि गोंधळलेला मतदार
लोकवेध live न्यूज
पूर्वी राजकारणाला त्यागाचे अधिष्ठान होते, आता ते भोगाचे झाले आहे. आजची राजकीय परिस्थिती अशी झाली आहे की, ‘राजकारण आणि राजकारणी’ हे दोन्ही इतके बदनाम झाले आहेत की, त्यांचा वापर शिवीसारखा होऊ लागला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या झालेली उलथापालथ जाहीरपणे हेच सिद्ध करते की, भाजप सत्त्ता उपभोगण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. शिवसेना पक्षात फुट घडवुन आणुन भाजपने सत्ता स्थापित केली असल्याची घटना ताजी असतानाच त्यात भरीस भर म्हणून राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी सत्तेत सहभाग घेतला. महाराष्ट्रातील राजकारणाला लागलेले हे अनपेक्षित वळण निश्चितच भाजपच्या छुप्या हेतुबद्दल चिंता दर्शविते. मोदींनी गेल्या नऊ वर्षात जे पेरले त्याला कोमारे फुटले आहेत. राहुल गांधींच्या खालुन वर झालेल्या पायपीटीने मोदींच्या पायाखालची वाळु घसरली आहे. बिहार आणि कर्नाटकात भाजपची पिछेहाट झाली. मोदींच्या एकहाती सत्तेच्या विरोधात अनेक प्रादेशिक नेत्यांनी हातात हात काय घेतला, मोदींची सदर थरथरताना दिसत आहे. मोदींची आश्वासने, फसलेली नोटबंदी, वाढता धार्मिक तणाव, वाढत्या दंगली, जळते मणिपुर आता राष्ट्रीय चैतन्याचे भांडवल होवून बसला आहे. त्यामुळेच की काय, मोदींची अलीकडची वक्तव्ये उदासवारे घेवून शब्दबद्ध होताना दिसत आहेत. त्या अनुषंगाने वस्तुनिष्ठपणे महाराष्ट्रातील आणि देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चिंतन होणे क्रमप्राप्त आहे.
एकेकाळी भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासोबत सरकार स्थापन करण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे उघडपणे सांगितले होते. देवेंद्र फडणवीस यांचा तो व्हिडिओ आजही उपलब्ध आहे आणि वेळोवेळी तो सोशल मीडिया वरती वायरल होत असतो. एवढा तीव्र विरोध असताना सुद्धा आज भाजपला राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती करण्यात काहीही हरकत असू नये हे उघडपणे या राजकारण्यांच्या सचोटीवर आणि लोकहितासाठीच्या त्यांच्या बांधिलकीवर प्रश्नचिन्ह निर्माण करते.
महाराष्ट्रात सध्या दोन महत्त्वाच्या आघाड्या आहेत. एक, भाजपाप्रणित महायुती आणि दुसरी, काँग्रेसप्रणित महाविकास आघाडी. पण इथल्या दोन महत्त्वाच्या दोन पक्षांचे तुकडे झाले आहेत. शिवसेना एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांमध्ये विभागली गेली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस ही शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये विभागली गेली आहे.
यातले एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे महायुतीत गेले आहेत, तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत आहेत. सोबतच एक-दोन जागांवर प्रभाव असलेले अनेक छोटेमोठे पक्ष आपलं महत्त्व राखून आहेत. आज त्यांनी कोणती बाजू निवडली नसली तरीही भविष्यात ते एखाद्या आघाडीत सामील होऊ शकतात. आघाड्यांची अशी रचना यापूर्वी कोणत्याच निवडणुकीत महाराष्ट्रानं पाहिली नसल्याने, जागा वाटपाचा कोणताच फॉर्म्युला अस्तित्वात नाही. त्यामुळेच, लोकसभेच्या ४८ आणि विधानसभेच्या २८८ जागांच्या महाराष्ट्राचं गणित, जागावाटपात कसं सोडवणार, हा सगळ्यांनाच चक्रावून टाकणारा प्रश्न आज आहे. याचं उत्तर कोणताच राजकीय पक्ष आज देऊ शकत नाही.
२०१४ मध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्रातली सत्ता बहुमतात मिळाल्यानंतर, आणि २०१९ लाही केंद्रामध्ये तो चमत्कार पुन्हा फिरून केल्यावर, दोन्ही वेळेस भाजप महाराष्ट्रातही सर्वात मोठा पक्ष बनला. एकदा १२२ आमदारांचा आणि दुसऱ्यांदा १०५ आमदारांचा. आजच्या परिस्थितीत आघाडीतल्या इतर पक्षांना जागा समान द्याव्या लागल्या, तर भाजप स्वबळावरच्या बहुमतापासून खूप लांब असेल. स्वबळावर बहुमताचे स्वप्न भाजप असं सोडून देईल का? महायुतीत एकनाथ शिंदे यांची बाजू बघितली तर त्यांच्यासोबत आलेल्या आमदारांच्या जागांबरोबरच इतर अधिक जागा ते किती पदरात पाडून घेतील हे आव्हान आहे.
शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह त्यांना मिळालेलं असल्यामुळे समान वाटा मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. पण १५२ ची घोषणा केलेला भाजप आणि ९० जागांची घोषणा केलेला अजित पवारांचा गट, यांच्या जागा झाल्यानंतर यांच्या गटाला किती जागा मिळतील?
जो प्रश्न महायुतीसमोर आहे तो महाविकास आघाडीसमोर सुद्धा आहे. महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या जागावाटपा समोरचा मोठा तिढा आहे, कोणी किती जागा लढवायच्या? राष्ट्रवादीच्या फुटीमुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपासमोर अनेक प्रश्न तूर्तास उभे केले आहेत. शरद पवारांसोबत असलेल्या राष्ट्रवादीची ताकद नेमकी किती आहे, ती शेवटपर्यंत आपल्या सोबत राहील का, याबद्दल संभ्रम आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे खासदार सध्या जास्त असले, तरी त्यांच्याकडे किती मतदारसंघात उमेदवार आहेत हा प्रश्न आहे. शिवाय काँग्रेसचा एकच खासदार गेल्या निवडणुकीत निवडून आला असला तरीही, त्यांच्याकडे अधिक मतदार संघात असलेली संघटनेची ताकद आणि उमेदवारांची उपलब्धता पाहता त्यांना अधिक जागा द्याव्या लागतील का हा प्रश्न आहे.
त्यात आज एका आघाडी अथवा युतीत असणाऱ्या पक्षांनी गेल्या अनेक निवडणुका कित्येक वर्षं विरोधात एकमेकांच्या लढवल्यामुळे आणि आता मात्र एकमेकांच्या सोबत लढवण्याची वेळ आल्यानं, प्रत्येक मतदार संघातली प्रस्थापित गणितं फोल ठरण्याची वेळही आली आहे. त्यामुळे कोणता मतदार संघ लढवण्यापेक्षा, कोणता सोडायचा यावरून भांडणं होतील असं चित्र आहे. शिवाय यातल्या चार मोठ्या पक्षाने गेल्या निवडणुकांमध्ये आपापल्या आघाड्यांमध्ये एकच मित्र पक्ष असल्याने जास्त जागा लढवल्या आहेत. पण या वेळेस मात्र अधिक मित्र झाल्यामुळे, खूप कमी जागा लढवण्यासाठी मिळू शकतील. परिणामी महाराष्ट्राची सध्याची राजकीय परिस्थिती ही पक्ष वाढवण्यापेक्षा, सत्तेत टिकून राहण्यासाठीची झाली आहे. गेल्या चार वर्षांत महाराष्ट्रात झालेलं राजकारण पाहता, कोणती मतं कुठं गेली आहेत हे कोणालाच निश्चित सांगता येणार नाही. प्रत्येक मतदारसंघाची पारंपारिक गणितं बदलली आहेत. शिवाय या नव्या राजकीय आघाड्यांसाठी मतदारांनी पूर्वी कधीही मतदान केलं नाही.
राष्ट्रीय राजकारणाचा विचार करता भाजपच्या अच्छे दिन मध्ये आता राम उरलेला नाही. शहा आणि मोदींच्या सत्तांध नितीने भाजपच्या संघ नितीची पार शकले उडाली आहेत. इडीसारख्या यंत्रणाची गैरवापर करणारी भाजपा आता निर्वस्त्र झाली आहे. हे नागडे राजकारण नकोसा झालेला निर्णायक मतदार संधीची वाट पाहताना अगदी दबा धरून बसला आहे. राम मंदीर आणि समान नागरी कायद्याच्या हुकमी पत्यावर मोदी २०२४ ची लोकसभा लढायला निघाले आहेत. मात्र त्यांचा बुरखा फाटलेला असताना मोदींच्या निरोपला २०२४ ऐवजी २०१९ चाच मुहुर्त लागण्याची शक्यता जास्त आहे.

– सुरेश मंत्री, अंबाजोगाई.
संपर्क- ९४०३६५०७२२
