­

विद्यार्थ्यांनी बनविले कोडींगच्या माध्यमातून व्हिडीओ….

 

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार विद्यार्थांनी चांगले यशस्वी, सर्जनशील, बदलाभिमुख आणि उत्पादनक्षम नागरिक व्हावे यासाठी क्षमता व कौशल्य यांचे अध्ययन करावे असे सुचविले आहे. त्याचबरोबर तंत्रज्ञानातील प्रगती कितपत पुढे गेलेली आहे याची अजूनही विद्यार्थांना कल्पना नाही. तसेच यासाठी विद्यार्थांना संगणकाची भाषा कोडींग शिकणे हे ही फार आवश्यक आहे. कारण तंत्रज्ञानातील वेगवान प्रगतीमुळे जगात झपाट्याने होत असलेले बदल कसे होत आहेत याची माहिती विद्यार्थांना माहीत असावी यासाठी, जिल्हा परिषद अहमदनगर आणि Code To Enhance Learning ट्रस्ट (CEL) यांनी सुरू केलेला कोड ऑन व्हील्स हा प्रकल्प भविष्याची नवीन ओळख करून देणारा अभिनव उपक्रम आहे.
तालुक्यातील जि.प.प्राथमिक शाळा पोखरी हवेली येथे विद्यार्थांसाठी कोड ऑन व्हील्स कडून कोडींग संदर्भात दोन दिवसाचा उपक्रम घेण्यात आला. त्या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थांना स्क्रॅच नावाच्या ॲप वर कोडींग च्या द्वारे एखाद्या समस्येवर अनिमेशन वर प्रोजेक्ट बनविण्यास सांगितल्या गेले. तसेच 3d प्रिंटर काय आहे याची ओळख करून देण्यात आली.

हा उपक्रम साधारणतः दोन दिवसाचा असतो.
पहिल्या दिवशी विद्यार्थांना समाजातील जनतेच्या समस्या निवडून कोडींगचा वापर करून त्यावर अनिमेशन तयार करण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यानी बनविलेल्या प्रकल्पाचे सादरीकरण केले.
गावातील काही समस्या लक्षात घेऊन विद्यार्थ्यानी स्वतः लॅपटॉप वर अनिमेशन बनविले. गावात पिण्याच्या पाण्याची समस्या असल्यामुळे गावातील पशु-पक्षी, आणि लोक गाव सोडून जात आहेत,ही समस्या लक्षात घेऊन विद्यार्थांनी छान अनिमेशन तयार केले. तसेच काही विद्यार्थांनी गावात कचऱ्याची फार मोठी समस्या आहे, त्यामुळे गावात कचरा कुंडी देण्यात यावी आणि ग्रामपंचाततर्फे कचऱ्याची गाडी देण्यात यावी, असा संदेश एका अनिमेशन द्वारे विद्यार्थांनी गावकऱ्यापर्यंत आणि ग्रामपंचायत सदस्यापर्यंत पोहचवला. त्याच प्रमाणे कोरडा दुष्काळ यावर सुद्धा छान असा प्रकल्प विद्यार्थांनी बनविला.या तयार केलेल्या प्रकल्पाचे सादरीकरण समारोप कार्यक्रमात प्रत्येक गटाने केले.याप्रसंगी सरपंच सुदाम खैरे,उपसरपंच सोमनाथ थिटमे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन आगळे,उपाध्यक्ष संदीप खैरे आदिसह सर्व विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. दोन दिवसात कोडींग मुळे विद्यार्थ्यांमध्ये कसा बदल घडून आला हे शाळेतील पदवीधर शिक्षक रावसाहेब पावसे यांनी त्यांच्या मनोगतातून सांगितले. तसेच दोन दिवसात विद्यार्थी कोडींग शिकले, त्यात त्यांचा विसर पडू नये यासाठी कोड ऑन व्हील्सचा हा उपक्रम पोखरी हवेली या शाळेत एक वर्षाचा असावा,अशी मागणीही केली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक तथा सहाय्यक केंद्रप्रमुख एकनाथ साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश साळुंके, शकुंतला शेळके, दस्तगीर शेख, सखाराम पाटील, राजेंद्र सूर्यवंशी, सोमनाथ मदने, तसेच कोड टू एनहान्स लर्निग ट्रस्टच्या प्रकल्प सहाय्यक प्रिती मेश्राम, काजल माळवदकर, मोबाईल वॅनचे चालक रमेश बनसोडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!