तमाशाला नव संजीवनी देणारा अवलिया कलाभूषण रघुवीर खेडकर

आज ज्येष्ठ तमाशा कलाकार कलाभूषण रघुवीर खेडकर यांच्या वाढदिवसनिमित्त लोकवेध live न्यूज तर्फे खूप खूप शुभेच्छा

 

लोकवेध live न्यूज

4 ऑगस्ट ज्येष्ठ तमाशा कलाकार कलाभूषण रघुवीर खेडकर यांचा वाढदिवस – रघुभाऊ माझे मानस बंधु… एक तरल मनाचा मनस्वी कलाकार, 1961 मध्ये आजच्या दिवशी मुंबईत जन्मलेल्या रघुभाऊचा तमाशा रंगभूमीवर पहिला प्रवेश झाला तो वयाच्या पाचव्या दिवशी. तमाशामहर्षि तुकाराम खेडकर आणि कान्ताबाई सातारकर यांच्या पोटी जन्मलेल्या रघुभाऊच्या रक्तातच तमाशा आहे. वयाच्या नवव्या वर्षापासुन स्टेज गाजवत हम भी कुछ कम नही हे भाऊने दाखवुन दिले. 1980 च्या दरम्यान भाऊने आई कांताबाईच्या तमाशाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली.
मागील 300-350 वर्षाच्या काळात तमाशाने अनेक संकटांशी सामना केला आहे.. दर शतकात 2-3 वेळा तमाशात मोठमोठे बदल झाले. 80 चे दशकही असेच होते. रंगीत टीव्हीचे आगमन झाले होते, विडिवो नावाचे करमणुकीचे यंत्र आले होते, सिनेमातही बदल झाला होता, अँग्री यंग मन सिनेमाचा हीरो झाला होता, डिस्को नावाचा नाच लोकप्रिय होत होता, ऑर्केस्ट्रा नावाचा रंगमंचीय अविष्कार खुपच लोकप्रिय झाला होता, कपड्यांच्या फॅशन बदलल्या होत्या…यातले तमाशात काहीच नव्हते. रघु भाऊ नावाच्या दूरदॄष्टीच्या पोरसवदा तरुणाने हे सारे बदल नेमकेपणाणे टिपले. महाराष्ट्रीय ग्रामीण आणि निमशहरी रसिकांची मानसिकता जाणुन भाऊने तमाशातच सिनेमा, ऑर्केस्ट्रा आणि नाटक दाखवायला सुरुवात केली…आणि तमाशा पुन्हा जिवंत झाला, पळू लागला. तमाशाला नवसंजीवनी देण्याच काम याकाळात रघुभाऊने केले. तमाशात हेलिकॉप्टर दाखवणे असो, बॉंब स्फोटाचे दृश्य असो भाऊने सारे काही हुबेहूब केले. नगीनाच्या गाण्यासाठी तर भाऊने चक्क 3-4 जिवंत नाग स्टेजवर आणले होते. नागपूरच्या अक्कु यादवचा संतप्त महिलांनी खुन केल्यावर महिनाभरात त्या विषयावरचा वग सादर केला. दिल्लीच्या कॉमन वेल्थ गेम्स च्या वेळी दिल्लीत तमाशा सादर केला. अनेक पुरस्कार मिळाले. रसिकांचे खुप प्रेम मिळवले, अमाप लोकप्रियता मिळाली-मिळते आहे. भाऊला तमाशाचा अमिताभ बच्चन म्हटले जाते ते उगीच नाही. पण कुठलाही जोकर, कॉमेडीयन, सोंगाड्या एक वेदना घेऊन जगत असतो. भाऊ तर तमाशातला सर्वात लोकप्रिय सोंगाड्या… त्याची वेदनाही तेव्हढी मोठी. तरुणपणातच बायको गेल्यावर पाचव्या दिवशी रसिकांना हसवणारा हा सोंगाड्या आजही लोकांना हसवतो आहे. मागील 30-35 वर्षात शाळा, वाचनालये, मंदिरे, अनेक गरजू लोकांना मदत म्हणून जे मोफत कार्यक्रम केले त्यातून सुमारे दिड -पावणे दोन कोटी रूपये मुक्तपणे वाटले… कुठे बातमी दिली नाही की फोटो… हे दान घेणाऱ्या 99% लोकांनीही कुठे भाऊचे नाव लावले नाही..लोकांना तमासगिरांचा पैसा चालतो पण नावाचा विटाळ होतो हेच खरे…..
आज भाऊ ६३ व्या वर्षांत पदार्पण करीत आहे. तमाशाला दिशा देण्याच काम करीत आहे. काही मोजके सन्माननिय अपवाद वगळता अनेक लोक तमाशाला आजही नावे ठेवीत आहेत पण मुळात पोटासाठी सादर केला जातो कलेतून मिळणारा आनंद वगैरे नंतरच्या गोष्टी त्यामुळे तमाशा न बघता भरल्यापोटी त्याला नावे ठेवणारे ठेवित राहतील. आमचा भाऊ स्वतःच्या पोटासाठी … ज्यांना रोजच्या जगण्याची भ्रांत आहे अशा कलेच्या भुकेल्या रसिकांसाठी तमाशा सादर करीत राहो याच शुभेच्छा.

डॉ संतोष खेडलेकर, संगमनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!