संगमनेरचा अशोक स्तंभ झालाय ७५ वर्षांचा…
लोकवेध live न्यूज
१५ ऑगस्ट १९४७, संगमनेरच्या नेहरू चौकात म्हणजेच जुन्या मोटार अड्ड्यावर सकाळपासून लोकांची गर्दी जमायला लागली होती. आदल्या दिवशी रात्री जरासा पाऊस झाल्याने संपूर्ण चौकात लावलेल्या पताकांचे रंगीत कागद पावसाने गळून गेले होते. हळूहळू पोलीस पथकासह पोलीस अधिकारी देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतलेली मंडळी आली. झेंडावंदन झाले. काँग्रेसचे नेते भैय्यासाहेब कुलकर्णी, रावबहादूर परशरामी आणि इतर नेतेमंडळींची भाषणे झाली.
या चौकातच तट्ट्या मारुतीचे छोटेसे मंदीर होते त्याच्या उत्तरेला मोकळी जागा होती. त्याठिकाणी देशाला स्वातंत्र्य मिळाले याची स्मृती कायम रहावी यासाठी अशोक स्तंभाची उभारणी करायची असे सर्वानुमते ठरले. त्यानुसार झेंडा वंदनानंतर अशोक स्तंभ उभारायच्या जागी कोनशिला समारंभ करून पाया खोदण्यात आला. संगमनेरच्या स्वातंत्र्य संग्रामात वेळोवेळी मदत करणाऱ्या मुरलीधर जयनारायण मालपाणी यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला. मुरलीधरजींनी यासाठी खास चांदीची थापी तयार करून आणली होती या थापीने त्यांनी वाळू आणि चुन्याचे मिश्रण खोदलेल्या पायात टाकले.
संगमनेरकरांनी जेव्हा अशोक स्तंभ उभारण्याचे ठरवले तेव्हा गावातलेच एक हरहुन्नरी कलाकार बाबुराव नाझर यांनी अशोक स्तंभ कसा असावा याचे रेखाचित्र तयार केले होते. बाबुराव नाझर म्हणजे संगमनेर आणि पंचक्रोशीतील नामवंत कलाकार. संगमनेरच्या कचेरीतील आपली नोकरी सांभाळून ते अतिशय उत्तम चित्र काढायचे. शाडूच्या मातीच्या अतिशय सुबक मूर्ती तयार करायचे. देशाला स्वातंत्र्य मिळणार आणि १५ ऑगस्टला देश स्वतंत्र होणार ही बातमी कळताच बाबुराव नाझर यांनी बाजारपेठेतील (कुंभार आळ्याच्या अलीकडे सध्या दिवंगत अशोकजी भुतडा यांचे रंगाचे दुकान आहे त्याच्या वरच्या मजल्यावर) आपल्या घरात पंडित नेहरू आणि महात्मा गांधी यांची चर्चा सुरु आहे या प्रसंगांचे शाडू मातीचे अतिशय सुरेख शिल्प तयार केले होते. संगमनेर बरोबरच परिसरातल्या लोकांची हे शिल्प बघण्यासाठी त्यांच्या घरी अक्षरशः रीघ लागली होती. असे हे बाबुराव नाझर. त्यांनी गावातल्या प्रतिष्ठित मंडळींशी बोलून अशोक स्तंभ कसा असावा याचे चित्र तयार केले. २३ फूट उंचीचे हे शिल्प कुठूनही बघितले तरी सारखेच दिसले पाहिजे हे लक्षात घेऊन त्यांनी शिल्पाचा आराखडा तयार केला.
प्रत्यक्षात शिल्प उभारण्याचे काम सर्वानुमते उमाजी पेंटर यांच्यावर सोपविण्यात आले. उमाजी म्हणजे चारचौघात उठून दिसेल असे उंचेपुरे व्यक्तिमत्व. त्यांचा मूळ व्यवसाय घड्याळ दुरुस्तीचा पण चित्रकला, शिल्पकला त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. सध्याच्या रंगार गल्लीतील कालिका देवी मंदिराशेजारी त्यांचे घर आणि घड्याळ दुरुस्तीचे दुकान होते. उमाजी यांनीच नगरपालिकेच्या सध्याच्या प्रवेशद्वाराची, त्याच्या आतील कॉटेज हॉस्पिटलच्या प्रवेश द्वारावरील दोन सिंह आणि कमानीची उभारणी केलेली आहे. त्यावेळी गावात उमाजी पेंटर, बाबुराव नाझर आणि सुंदरराव खरे मिस्त्री या तीन दिग्गज कलाकारांची मैत्री सर्वांच्या चर्चेचा विषय असायची. तिघेही कलाक्षेत्रात कार्यरत असून त्यांच्यात कोणतीही स्पर्धा नव्हती.
बाबुराव नाझर यांनी तयार केलेले अशोक स्तंभाचे संकल्प चित्र घेऊन उमाजी पेंटर यांनी अशोक स्तंभाच्या कामाला सुरुवात केली. चारही बाजूने बांबूचे पहाड बांधून उमाजी आपले काम करीत होते. सुमारे सात आठ महिने हे काम सुरु होते. मोटार अड्ड्यावर जमा झालेली मंडळी हे काम बघण्यासाठी रोज गर्दी करायची. मुदतीपूर्वीच अशोक स्तंभ तयार झाला. आपल्या कसबी हातांनी उमाजींनी त्याची रंगरंगोटी केली. याचे उद्घाटन १५ ऑगस्ट १९४८ रोजी करायचे हे अगोदरच्या वर्षीच नक्की झाले होते. त्यानुसार उद्घाटनासाठी पाहुण्यांचा शोध सुरु झाला. अखेरीस नामदार हरिभाऊ पाटसकर यांनी संगमनेर मधील अशोक स्तंभाच्या उद्घाटन समारंभाला येण्याचे मान्य केले. त्यानुसार मोठ्या उत्साहात हा उद्घाटन समारंभ पार पडला. कदाचित स्वातंत्र्योत्तर काळात देशात उभारलेला हा पहिला अशोक स्तंभ असावा.
याच चौकात अशोक स्तंभाच्या साक्षीने पुढील सुमारे पन्नास वर्षे देशभरातील अनेक दिग्गज नेत्यांच्या सभा झाल्या. या ठिकाणचा मोटार अड्डा नंतर सय्यद बाबा चौकात गेला आणि इथे भाजी बाजार भरू लागला. त्याकाळातील गावातील मध्यवर्ती ठिकाण असल्याने नेहरू चौकात भाजीपाला, धान्य व इतर सामानाची दुकाने थाटली गेली… आणि इथूनच देशाच्या अस्मितेचे प्रतिक असलेल्या अशोक स्तंभाची हेळसांड सुरु झाली. कधी काळी तारेचे पक्के कंपाऊंड आणि त्याच्या आत लावलेली फुलझाडे हळू हळू नाहीशी झाली.. अशोक स्तंभाभोवती धान्याची दुकाने, वडापाव, आम्लेट पावची दुकाने थाटण्यात आली. कधीतरी पालिकेत एखादा खमक्या अधिकारी येतो, इथली अतिक्रमणे तात्पुरती हटवली जातात… पुन्हा काही काळानंतर नवीन दुकाने उभी राहतात…
नव्या पिढीतील अनेकांना कदाचित आपल्या गावात असा काही अशोक स्तंभ आहे हे माहितही नसेल. या वर्षी आपल्या गावातला हा अशोक स्तंभ ७५ वर्षांचा होतोय… आपला अमृतमहोत्सव साजरा करतोय… या अमृतमहोत्सवी वर्षांपासून पुढील काळाततरी आपण सगळे मिळून याला मोकळा श्वास घेऊ देऊ अशी अपेक्षा बाळगूया.
डॉ. संतोष खेडलेकर
