गगनगिरी विद्यालयाचा मुका सोबती राजा कुत्रा ;
पोळ्यानिमित्त विद्यार्थ्यांनी राजाला (कुत्रा) सजवून केले प्राणी प्रेम व्यक्त
पिंपरणे / लोकवेध live न्यूज 
श्रावण महिन्यातील अमावस्या महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये बैलपोळा म्हणून साजरी केली जाते. चराचरसृष्टीतील सजीव निर्जीव यांच्या विषयी मानवाने कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी योजलेल्या काही महत्त्वाच्या सणांमधील  एक सण बैलपोळ्याचा आहे. भारतीय संस्कृतीमध्ये मानवाला उपयुक्त असणाऱ्या माती, पाणी ,अग्नी या निर्जीव घटकांनाही पंचमहाभूतांच्याद्वारे नमन केले जाते. त्याचप्रमाणे जे प्राणी पशुपक्षी मानवाला उपयुक्त आहेत त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचे काही दिवस असतात.  नागपंचमी वटपौर्णिमा, धुलीवंदन अशी अनेक उदाहरणं आहेत. शेतीप्रधान भारत देशामध्ये बैल हा शेतकऱ्यांचा जवळचा मित्र. त्याच्याविषयी कृतज्ञतेचा दिवस म्हणजे बैलपोळा. त्याचबरोबर गाया, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, अगदी कुंभार बंधूंना उपयुक्त ठरणारे गाढवही या निमित्ताने पुजले जाते. त्याला आंघोळ घालुन स्वच्छ करणे, सजवणे, गोडधोड खाऊ घालणे. हा सगळा कृतज्ञता व्यक्त करण्याचा भाग. दिवसेंदिवस त्याचे स्वरूप बदलत चाललंय पण भाव मात्र तोच आहे. घरातील कुत्र्या मांजरांवरती प्रेम करणारी मंडळी आपल्या मानसिक आरोग्यासाठी संरक्षणासाठी असणाऱ्या या कुत्र्या मांजरांच्या विषयी सुद्धा कृतज्ञता व्यक्त करतात. आता तर अगदी ट्रॅक्टर विषयीची कृतज्ञता ट्रॅक्टरचा पोळा साजरा करूनही केली जाते. त्याचाच एक भाग म्हणजे आमच्या विद्यालयातील राजा नावाच्या कुत्र्या विषयी व्यक्त केलेली कृतज्ञता.
हा आमचा राज्या
आमचा म्हणजे ,संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या शैक्षणिक संकुलातील सर्व विद्यार्थी शिक्षक सेवक या सगळ्यांचा जणू एक सोबतीच.
 एखाद्या शैक्षणिक संकुलाला असा एखादा कुत्रा असन ही तशी दुर्मिळ बाब म्हणावी लागेल पण या शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष सन्माननीय बापूसाहेब देशमुख असे म्हणतात,  इथे जोडलेला प्रत्येक जणू महाराजांच्या संपर्कातील आहे .कधीतरी कुठल्यातरी जन्मामध्ये महाराजांशी त्याचं असं कुठल तरी एक नातं आहे.ऋणानुबंध आहेत.  महाराजांशी जोडले गेलेली सगळी मंडळी या शैक्षणिक संकुलात आहेत.
 असं वाटतं की हा राजा सुद्धा कधीतरी महाराजांशी जोडलेला असणार आहे .
खरतर या शैक्षणिक संकुलामध्ये आठवड्याचे सातही वार आणि दिवसातले चोवीस तास किमान एक तरी कर्मचारी उपस्थित असतो.  मध्यंतरी शैक्षणिक संकुलामध्ये बाहेर लाईट बसवलेले नव्हते. त्यामुळे बऱ्याच वेळा अंधार असायचा. अनेकदा वाघाची ही भीती असायची. अशावेळी रात्री एकट्या कर्मचार्‍याला भीती वाटायची. हे एकटेपण जाण्यासाठी हा राजा त्याची साथ करायचा .बाहेर पडवीमध्ये बसून राहायचा. त्याची सोबत रात्रीच्या वेळी त्या एकट्या कर्मचाऱ्याला खूप महत्त्वाची होती आणि मग त्या राजाला आपल्या जेवणाच्या डब्यातील काही वाटा दिला जातो.
 दिवसभर शाळेच्या पडवीमध्ये ऑफिस समोर ,स्टाफ रूम समोर किंवा स्टेज जवळ बसलेला असतो राजा.
 गंमत अशी की सर्व विद्यार्थी त्याला जीव लावतात .हा राजा विद्यार्थी, पालक ,शिक्षक या कुणावरही भुंकत नाही. राजाला शाळेच्या वेळा, मधल्या सुट्टीची वेळ सगळं माहिती आहे .मधली सुट्टीची वेळ झाली की राजा,बेल झाल्याबरोबर मुलांच्या आधी कॅन्टीनच्या परिसरात शालेय पोषण आहारासाठी जाऊन बसतो. मग काय त्याला मेजवानीच असते. मुलांच्या डब्यातील आणि शालेय पोषण आहारातील काही वाटा त्यालाही मिळतो. पुन्हा बेल झाली वर्ग भरताना राजा पुन्हा पडवीत येऊन विसावलेला असतो .
लॉकडाऊन पूर्वी इतरही कुत्री पोषण आहाराच्या निमित्ताने शाळेच्या परिसरात दिसत असेत.पण कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये मात्र विद्यार्थी नाही,  शिक्षकांचही येणं-जाणं नाही, डबा नाही ,शालेय पोषण आहार नाही सगळीकडे शुकशुकाट  तरी राजा इमानेइतबारे पडवीत बसलेला असे. ड्युटीवरील कर्मचारी याची काळजी घेत .
आपण केव्हाही जा राजा जनू आपली वाट पाहतात  बसलेला. आपल्या स्वागतासाठी सज्ज .
असा हा राजा .आमच्या शैक्षणिक संकुलाचा जणू एक सदस्य आहे .काहीतरी ऋणानुबंध त्याच्याशी निगडित आहेत. राजाकडे पाहिलं की आम्हा सर्वांना खोपोलीच्या आश्रमात दिसणाऱ्या  कुत्र्यांची आठवण येते सद्गुरु गुरुदेव दत्तांच्या आसपास असणाऱ्या कुत्र्यासारखा हा राजा. विद्यार्थ्यांना भूतदया, मुक्या प्राण्यांवर प्रेम करणं ,इमानदारपणा यांची शिकवण देणारा …आमचा मुका सोबती
*स्वामी गगनगिरी महाराजांच्या, सर्वांवर प्रेम करण्याच्या शिकवणुकीची आठवण करून देणारा,,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!