ज्येष्ठ अभिनेत्रीचा उचित सन्मान
लोकवेध live न्यूज
भारतीय चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात प्रदान केला जाणार आहे. वहिदा रहमान यांनी ६०–७० च्या दशकात बॉलिवूडवर राज्य केलं. इतकंच नाही तर, वहिदा यांनी १९६४ ते १९६९ या काळात हिंदी सिनेसृष्टीती सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री असा त्यांचा नावलौकिक आहे. त्यांचे चित्रपट आजही प्रेक्षक आवडिने बघतात. अमिताभ बच्चन यांची आवडती अभिनेत्री वहीदा रहमान असून, त्यांनी अनेक चित्रपटात बिग बींच्या आईची भूमिका साकारली आहे. वहिदा रहमान आणि देव आनंद यांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. ‘सीआयडी’ पासून ‘गाईड’ पर्यंत या दोघांनी अनेक उत्तम चित्रपट एकत्र केले आहेत. नेमकं देव आनंद यांच्या वाढदिवशी वहिदा यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा झाली याचा आनंद स्वतः वहिदा यांनी व्यक्त केला.
वहिदा यांचा जन्म जन्म तामिळनाडूतील चेंगलपेट गावात एका उच्चविभूषीत मुस्लीम कुटुंबात ३ फेब्रुवारी १९३८ साली झाला. वडील त्याकाळचे आयएएस अधिकारी. १३ वर्षांच्या असताना वहिदांना चित्रपटाच्या ऑफर्स येऊ लागल्या होत्या. अनेक निर्माता -दिग्दर्शकांनी त्यांना चित्रपटात काम करण्याच्या ऑफर्स दिल्या. पण वहिदा यांच्या वडिलांनी त्या धुडकावून लावल्या. खरंतर वहिदा यांना डॉक्टर बनायचं होत पण वडिलांचे निधन झाल्यावर संपूर्ण घराची जबाबदारी वहिदा यांच्या खांद्यावर आली आणि आर्थिक गरज भागवण्यासाठी वहिदा चित्रपटसृष्टीत आल्या.
वहिदा रहमान यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात तेलुगू सिनेमामधून केली होती. अनेक सिनेमांमध्ये वाहिदा रहमान यांनी आयटम नंबर केलं आहे. एक दिवस असा आला जेव्हा गुरुदत्त यांची नजर वाहिदा रहमान यांच्यावर पडली आणि त्यांचं नशीब चमकलं. हिंदी सिनेविश्वात वाहिदा रहमान यांना आणणारे गुरुदत्त होते. वहिदा रहमान यांनी अभिनेते देवानंद यांच्यासोबत सीआयडी सिनेमाच्या माध्यमातून पदार्पण केलं. यामध्ये त्यांची नकारात्मक भूमिका होती. कही पे निगाहे कही पे निशाना…. या गाण्यावर वहिदाचं नृत्य कौशल्य, तिच्या डोळ्यांच्या अदा, बोलका चेहरा आणि निरागस हास्य यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत नवीन सुपरस्टारचं आगमन झाल्याची वर्दी मिळाली..त्यांच्या कामाचं खूप कौतुक झालं. त्यानंतर वाहिदा रहमान यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. जवळपास सात दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी आपली एक ओळख निर्माण केली आहे. गाइड’, ‘प्यासा’, ‘साहेब बीबी और गुलाम’, ‘दिल्ली-६’, ‘कागज के फूल’, ‘खामोशी’, ‘चौधवी का चाँद’, रंग दे बसंती’, ‘राम और श्याम’ यासह इतर अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी अविस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. वहिदा रहमान यांनी अनेक हिंदी, तामिळ, तेलुगू आणि बंगाली सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे. त्यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक दिग्गज कलाकारांसोबत स्क्रीन शेअर केली आहे. देव आनंद, राज कपूर, राजकुमार, मनोज कुमार आणि सुनील दत्तसह अनेक अभिनेत्यांसोबत त्यांनी काम केलं. अभिनेते गुरुदत्त यांच्यासोबत त्यांचे अनेक सिनेमे गाजले. ब्लॅक अँड व्हाईट जमान्यापासून ते रंगीत दुनियेपर्यंत वहिदा रहमान यांनी विविध भूमिका साकारून आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं आहे. एप्रिल १९७४ साली वहिदा यांनी अभिनेता शशी रेखीव यांच्यासह लग्नगाठ बांधली. त्यांना दोन मुले असून, सोहेल रेखी आणि काश्वी रेखी, दोघेही लेखक आहेत.
वहिदा रहमान यांना राष्ट्रीय पुरस्कार, २ वेळा फिल्मफेअर पुरस्कार, १९७२ मध्ये भारत सरकारकडून पद्मश्री तर २०११ मध्ये पद्मविभूषण यांसारख्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. पण या अभिनेत्रीने त्याचा कधीही बाऊ केला नाही. दादासाहेब फाळके पुरस्कार हा चित्रपट क्षेत्रातील भारतातील सर्वोच्च पुरस्कार आहे. सिनेविश्वात मोलाचं योगदान असलेल्या कलाकारांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येत. या पुरस्काराची घोषणा वर्षातून एकदा होते. गतवर्षी हा पुरस्कार अभिनेत्री आशा पारेख यांना देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता.
तुम्ही जे निवडता, त्यावर तुमची श्रद्धा असेल आणि कामाप्रती निष्ठा असेल तर तुम्ही अगदी पहिल्या दिवसापासून तुमचे नियम लोकांना स्वीकारायला लावू शकता हे वहिदाजींनी दाखवून दिलं. पहिल्याच सिनेमात त्यांनी एका सीनसाठी मी वेडेवाकडे कपडे घालून शॉट देणार नाही असं ठासून सांगितलं. पहिलाच सिनेमा आहे, डायरेक्टर जे सांगेल ते ऐकलं पाहिजे इत्यादी गोष्टींना बाजूला सारत, मी जर ह्या क्षेत्रांत टिकणार असेन तर माझ्या तत्वांशी मी तडजोड करणार हे नाही हे सांगणं सोपं नाही, पण ते वहिदाजींना जमलं. स्वतःचं मुस्लिम नाव, आडनाव पण लपवण्याच्या भानगडीत त्या कधी पडल्या नाहीत आणि त्यांचं हिंदुस्थानीपण इतकं पक्क होतं की त्यांचा धर्म लोकांच्या मनाला शिवला पण नाही. त्यांच्या स्वभावामुळेच त्या नेहमी ख-या वाटल्या… जे आहे ते स्विकारलं आहे. हा त्यांचा रोखठोकपणा त्यांनी साकारलेल्या भूमिकांमध्येही डोकावला. चित्रपटांनंतर आपले आयुष्य लोककल्याणासाठी आणि समाजाच्या हितासाठी समर्पित केलेल्या वहीदा रेहमान यांना या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करणे ही भारतीय चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या महिलांपैकी एक असलेल्या वहीदा रेहमान यांना मानवंदना आहे.

सुरेश मंत्री, अंबाजोगाई.
संपर्क – ९४०३६५०७२२
