पोदार इंटरनॅशनल स्कूल ओझर विद्यालय येथे स्वयंसेवक’ कार्यक्रमांतर्गत’ विविध वस्तूंचे वाटप
नाशिक / लोकवेध live न्यूज
देण्याचा आनंद आपल्याला कृतज्ञ व्हायला शिकवतो.
बदल्यात कशाचीही अपेक्षा न करता देण्याचा आनंद एकदा अनुभवला की आपण कोण आहोत हे बदलते. इतरांना मदत करण्याचा आनंद आपल्या जीवनाला उद्देश आणि अर्थ देतो आणि आपण त्यांच्याबद्दल कृतज्ञतेची भावना जागृत करतो.
हाच उद्देश मनात बाळगून विद्यार्थ्यांना कृतज्ञतेची जाणीव व्हावी त्याचबरोबर कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता इतरांना मदत करण्याची भावना जागृत व्हावी म्हणून पोदार इंटरनॅशनल स्कूल ओझर विद्यालयाने ‘जॉय ऑफ गिविंग’ या उपक्रमाच्या माध्यमाने विद्यालयाच्या प्राचार्या जसिंथा पारके यांच्या मार्गदर्शनाने त्र्यंबकेश्वर मधील वाळुंज येथील पत्रांचा वाडा या ११८ बेघर मुलींसाठी शाळा चालवणाऱ्या स्वयंसेवी संस्थेला पोद्दार इंटरनॅशनल स्कूल ओझर येथील विद्यार्थ्यांनी दिलेल्या जसे पेन्सिल पाऊच, कपडे, पाण्याची बाटली, टिफिन बॉक्स, खेळणी आणि शाळेची दप्तरे इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे आणि मोठया प्रतिसादाने सर्व वस्तू विद्यालयात जमविलेल्या होत्या. त्र्यंबकेश्वर येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय येथील मुख्याध्यापिका भागवत मॅडम आणि आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांना इतकी छान भेट दिल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानले. त्याचबरोबर तालुकाप्रमुख समाधान भाऊ पाटील, ग्रामसेविका योगिता पुंड, ग्रामपंचायत सदस्य दामू देवराम उधी यांनी देखील गरजू विद्यार्थ्यांना मदत केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.
