पोदार इंटरनॅशनल विद्यालय ओझर येथे ‘ वार्षिक क्रिडा महोत्सव’ उत्साहात साजरा

नाशिक / लोकवेध live न्यूज

खेळ माणसाला निरोगी बनवतो, शक्तीचा संचार करून शरीराला तंदुरुस्त बनवतो.
देवाने माणसाला शक्तीचे वरदान दिले आहे, खेळून या अलौकिक शरीराला नवसंजीवनी देऊ या. २५ नोव्हेंबर रोजी पोदार इंटरनॅशनल स्कूल ओझर येथे वार्षिक क्रीडा महोत्सव अतिशय उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त अशोक दुधारे या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आणि विद्यालयाच्या प्राचार्या जसिंथा पारके, श्रावणी कमुजू, विशाल मेंढे पालक शिक्षक संघ सदस्य यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रीडाध्वज फडकवण्यात आला. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत विद्यालयाच्या प्राचार्या जसिंथा पारके यांच्या हस्ते सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणाद्वारे विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि खेळाबद्दल मार्गदर्शन देखील केले. विद्यालयातील सर्व संविधानिक मंडळातील विद्यार्थ्यांनी मार्च पासचे उत्कृष्ट प्रस्तुतीकरण केले. या क्रीडा महोत्सवात विद्यालयातील विद्यार्थ्यांनीस्वागत गीत, स्वागत नृत्य त्याच बरोबर खेळाचा उत्साह अधिक द्विगुणित करण्यासाठी विविध प्रकारच्या नृत्यांचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेले पिरॅमिड हे या कार्यक्रमाचे आणखी एक आकर्षण होते. विद्यालयातील एक्वा, टेरा, इग्निस, वेंटस हाऊसच्या कप्तानांनी मशाल प्रज्वलित करून ॲथलेटिक स्पर्धेची सुरुवात केली. ॲथलेटिक्स स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांसाठी पोता शर्यत, धावण्याची शर्यत, डंबेल शर्यत, रिंग शर्यत, बूक बॅलन्सिंग शर्यत, लिंबू चमचा, रीले शर्यत इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर विद्यालयातील पालकांकरिता धावण्याची शर्यत आणि लिंबू चमचा या दोन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पालकांनी देखील या दोन स्पर्धांमध्ये आपला उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला आणि मोठ्या उत्साहाने व जोशाने स्पर्धा पूर्ण केली. त्यानंतर बक्षीस वितरण सोहळा पार पाडण्यात आला. विजेत्या सर्व विद्यार्थ्यांना, सहभागी विद्यार्थ्यांना आणि विजेत्या पालकांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अंतिम चरणी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी मनमोहक असे ढोल वाद्याचे प्रस्तुतीकरण केले. विद्यालयाच्या प्राचार्या जसिंथा पारके यांनी विद्यार्थ्यांना खेळाची भावना टिकवून ठेवण्यासाठी प्रेरित केले. या कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाचे क्रीडा शिक्षक राकेश शर्मा यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे शिक्षक प्रवीण कदम यांनी पार पाडले त्याचबरोबर विद्यालयाच्या समन्वयक शिक्षिका वैशाली वाघ यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाच्या प्राचार्या जसिंथा पारके यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!