जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघात ईव्हीएम बाबत जनजागृती मोहीम…

माढा तालुका / लोकवेध live न्यूज / हनुमंत मस्तुद

ईव्हीएम बाबत जनजागृती मोहीम…
जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी दोन प्रमाणे एकूण 22 ईव्हीएम वाहनाद्वारे जनजागृती, माहे फेब्रुवारी 2024 पर्यंत ही मोहीम राबवली जाणार
नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, उत्तर व दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयातही ईव्हीएम ची प्रात्यक्षिके मतदारासाठी उपलब्ध, हजारो मतदारांनी येथे मतदान करण्याचे प्रात्यक्षिक घेतले
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सर्वसामान्य नागरिक व मतदार यांना ईव्हीएम प्रणाली बाबत माहिती व्हावी. तसेच नव मतदारांना मतदान कसे करायचे याचे प्रात्यक्षिक मिळावे यासाठी जिल्ह्याच्या 11 विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी दोन याप्रमाणे 22 मोबाईल व्हॅन द्वारे ईव्हीएम मशीनचे प्रात्यक्षिक तसेच याबाबत जनजागृती मोहीम मंगळवार दिनांक 26 डिसेंबर 2023 पासून राबविण्यात येणार असून जिल्ह्यातील सर्व नागरिक व मतदारांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.
ईव्हीएम प्रणाली ची माहिती देणे तसेच नव मतदारांना मतदानाचे प्रात्यक्षिक दाखवणे तसेच ईव्हीएम मशीन कशा पद्धतीने सुरक्षित आहे याबाबत सर्वसामान्य नागरिक तसेच मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी दिनांक 26 डिसेंबर 2023 ते २८ फेब्रुवारी 2024 पर्यंत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 2 ईव्हीएम जनजागृती मोबाईल व्हॅन देण्यात आलेल्या असून प्रत्येक मोबाईल व्हॅन प्रतिदिन दोन गावांमध्ये जाऊन ईव्हीएम मशीन ची माहिती देणे, नव मतदारांना प्रात्यक्षिक दाखवणे तसेच ईव्हीएम यंत्र सुरक्षित आहे, ते आपण केलेल्या मताचे सुरक्षित कवच आहे याबाबत नागरिकांमध्ये प्रबोधन केले जाणार आहे. संपूर्ण जिल्ह्यासाठी 22 जनजागृती मोबाईल व्हॅन द्वारे माहिती दिली जाणार असून उत्तर व दक्षिण सोलापूर तहसील कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वसामान्य लोक व मतदारांसाठी ईव्हीएम प्रात्यक्षिक सेवा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
ईव्हीएम यंत्र नव्हे आपल्या मताचे ब्लूटप्रुफ कवच असून आपले इलेक्ट्रॉन मतदान यंत्र खालील कारणामुळे अत्यंत सुरक्षित असल्याचा संदेश मोबाईल जनजागृती व्हॅन द्वारे देण्यात येत आहे. यामध्ये कोणत्याही हस्तक्षेपापासून अलिप्त, विनापरवाना अनधिकृत वापर ओळखण्याच्या तंत्रज्ञाने सुसज्ज, सांकेतिक लिपीबधतेच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज, स्वतःची कार्यक्षमता आणि स्थिती स्वतःच ओळखण्याच्या क्षमतेने सुसज्ज व रेडिओ फ्रिक्वेन्सीच्या माध्यमातून माहितीच्या आदानप्रदानाबाबत अक्षम, या कारणाने ईव्हीएम मशीन सुरक्षित आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी दिली.
*जिल्ह्याची मतदार संख्या –
सोलापूर जिल्ह्यात दोन लोकसभा व अकरा विधानसभा मतदार संघ असून 27 ऑक्टोंबर 2023 नुसार जिल्ह्यात 36 लाख 33 हजार 72 इतके मतदार असून यामध्ये 18 लाख 89 हजार 234 पुरुष, तर 17 लाख 43 हजार 579 स्त्री मतदार आणि इतर 259 मतदार आहेत. तर 3 हजार 599 मतदार केंद्र आहेत. 5 जानेवारी 2024 रोजी एक जानेवारी 2024 च्या आहर्ता दिनांकावर आधारित पुननिरीक्षण मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!