अंधारात अंदाज न आल्याने दुचाकी थेट विहिरीत कोसळून एक ठार झाल्याची घटना.
राहाता :लोकवेध live न्यूज
तिघे जण दुचाकीवरून घरी परतत
असताना अंधारात अंदाज न आल्याने दुचाकी थेट विहिरीत कोसळून एक जण ठार झाल्याची घटना घडली आहे. जागरण गोंधळाच्या कार्यक्रमासाठी आलेले पाहुणे पुन्हा घराकडे परतत असताना शिर्डी विमानतळ रस्त्यावर दुचाकी थेट विहिरीत पडली. या अपघातात एकजण ठार झाला. भरत शंकर भडांगे (वय ३२, रा. कोठे-कमळेश्वर, ता. संगमनेर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, केलवड विमानतळाकडे येथून शिर्डी जाणाऱ्या रस्त्याशेजारील तलावालगत ही घटना घडली. सोमवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास अंधारात ही घटना घडली.. केलवड येथे जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी दुचाकीवर तीन व्यक्ती आल्या. ते पुन्हा घरी परतत असताना अंधारात अंदाज न आल्याने दुचाकी थेट विहिरीत कोसळली. आजूबाजूच्या नागरिकांनी जखमींना श्री साईबाबा रुग्णालयात दाखल केले. मात्र, भरत भडांगे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला आहे. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
