उत्कर्षा रुपवते निवडणूकीच्या रिंगणात : रुपवतींची उमेदवारी कोणाला ठरणार घातक लोखंडेंना की वाकचौरे यांना
उत्कर्षा रुपवतेंनी घेतली आंबेडकरांची भेट, ‘वंचित’कडून नशीब आजमावणार
शिर्डी लोकसभा मतदारसंघात बौद्ध समाजाचे मतदार जास्त असल्याने या ठिकाणी बौद्ध उमेदवार द्यावा, अशी मागणी अनेक बौद्ध संघटनांनी केली आहे.
शिर्डी / लोकवेध live न्यूज
लोकसभा निवडणुकीचे वारे आता वेगाने वाहू लागले आहे. जसं जसं उन्हाचा पारा चढतोय तसेच राजकारण देखील तापायला लागले आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने या ठिकाणी राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रुपवते काँग्रेसकडून उमेदवारीसाठी आग्रही होत्या. मात्र महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाला सुटल्याने उत्कर्षा रूपवते उमेदवारी पासून ‘वंचित’ राहिल्या. आता रुपवते त्यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतलाय. रुपवतेंनी नुकतीच वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्याने आगामी निवडणूक उत्कर्षा रुपवते वंचितच्या तिकिटावर लढवणार असल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे टेन्शन वाढणार असल्याचे बोलले जात आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघात बौद्ध समाजाचे मतदार जास्त असल्याने या ठिकाणी बौद्ध उमेदवार द्यावा, अशी मागणी अनेक बौद्ध संघटनांनी केली आहे. तसेच बौद्ध समाजातील उत्कर्षा रुपवते देखील गेल्या अनेक महिन्यांपासून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आहेत. परंतु शिर्डी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने आयात भाऊसाहेब वाकचौरेंना उमेदवारी जाहीर केल्याने नाराज उत्कर्षा रुपवतेंनी वंचितचा पर्याय निवडला असल्याची माहिती आहे. उत्कर्ष रुपवते वंचित बहुजन आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वाकचौरे यांची डोकेदुखी वाढणार असून त्यांना मत विभाजनाचा फटका बसेल. तर दुसरीकडे महायुतीच्या उमेदवाराला याचा फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे.
वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडी सोबत न जाता वेगळी चुल मांडली आहे. त्यामुळे अनेकजण प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीला पोहोचत आहेत. उत्कर्षा रुपवते काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. त्यांनी बंडखोरी करत इतर पर्याय निवडला तर महाविकास आघाडीच्या उमेदवारासमोर मोठे आव्हान उभे राहणार असल्याची चर्चा आहे. आगामी काळामध्ये उत्कर्षा यांचे बंड थंड करण्यामध्ये महाविकास आघाडी यशस्वी होणार की उत्कर्षा रुपवते वंचितकडून निवडणूक लढवणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब
वाकचौरे यांच्यावर पडलेल्या गद्दारीचा शिक्का काही केल्या पुसला गेलेला नाही. जनतेमध्ये त्यांच्याबाबत प्रचंड नाराजी असूनही, त्यांच्याच गटात अनेक हेवेदावे असल्याने त्याचा परिणाम मतदानावर होणार असल्याची चर्चा आहे.
अवघ्या १७ दिवसात केवळ नशीब आणि मोदी लाटेवर स्वार होऊन विजयी झालेले शिंदे गटाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनी पुन्हा निवडून येण्याचे स्वप्न पाहिले असले तरी, त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे मतदारसंघात त्यांच्यावरही प्रचंड नाराजीचा सूर उमटत आहे. त्यांच्या कार्यकाळात ते मतदारसंघात फिरकले नसल्याने मतदारांमध्येही नाराजी असल्याचे दिसून येते.
एकंदरीतच उत्कर्षा रूपवते यांच्या राजकिय कारकिर्दीला या वेळी नक्कीच बळ मिळेल अशी सकारात्मक परिस्थीती निर्माण झाली आहे. त्यांचा हा निर्णय योग्य असल्याची प्रतिक्रीया समाजमाध्यमांवर उमटू लागली आहे. त्यांना माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार सुधीर तांबे यांनी मदत केल्यास, रुपवते यांना ही निवडणूक मुळीच अवघड जाणार नाही. विशेष म्हणजे ज्याप्रमाणे आमदार सत्यजित तांबे यांना भाजपने मदत केली आणि ऐन वेळेस उमेदवार रद्द केला त्याप्रमाणे शिर्डी मतदार संघात थोरात आणि तांबे यांनी ठरवले तर ते रुपवते यांना वंचितमधून निवडून आणू शकतात अशी चर्चा दबक्या आवाजात मतदारसंघात होत आहे. तर आता उत्कर्षा रूपवते राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा निर्णय घेणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार असून, त्या वाकचौरे आणिलोखंडे यांच्यासाठी डोईजड होणार असल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे.
