विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तन होणे हीच क्रांती :- भारत रेघाटे
[ अगस्त क्रांती, आदिवासी व ग्रंथालय दिन साजरा ]

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

विद्यार्थ्यांनी वैचारिक दृष्ट्या सक्षम होवून शालेय परीक्षे बरोबर जीवनाच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी आपल्या लेखणीतून क्रांती घडविण्याचे काम केले पाहिजे. हल्लीचे मुले मोबाईलच्या आहारी गेल्याने एकूणच त्याचा
दुष्परिणाम आहार ,निद्रा आणि जीवनावर होत असल्याने भविष्यात विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर देशासाठी हे चित्र घातक ठरणार असल्याचे प्रतिपादन अभ्यासक भारत रेघाटे यांनी व्यक्त केले. मातोश्री. रू. दा. मालपाणी विद्यालयात ऑगस्ट क्रांती, आदिवासी आणि ग्रंथपाल दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर मुख्याध्यापक मच्छिंद्र हापसे, शिक्षक चंद्रशेखर कानडे उपस्थित होते. भारत स्वतंत्र होण्यापूर्वी चिमूर गाव स्वतंत्र झाले. तर संत तुकडोजी महाराजांनी यावली शहीद या गावात आपल्या खंजिरीतून स्वातंत्र्य लढ्याचे रणशिंग फुंकत शूरवीरांना आपल्या रचनेतून प्रेरित केले. 107 हुतात्म्याबरोबर सावरकर, आगरकर, टिळक, गांधी, रामा किरवाची फाशी,
वासुदेव बळवंत फडकेंचे साकूर येथील बंड, बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, सुखदेव, राजगुरू, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, यांच्या विषयी माहिती देत विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले, डॉ. श्रीकांत जिचकार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लिओनार्दो दा विंची, ज्येष्ठ शास्त्रज्ञ वसंतराव गोवारीकर अशा विविध क्षेत्रातील महान विभूतींचा आदर्श घेत विद्यार्थ्यांनी जीवनात क्रांती करण्याचे काम केलं पाहिजे असे ते म्हणाले. शाळेत गुणांकाने प्रथम येणारा विद्यार्थी ही सुद्धा एक क्रांतीच आहे. एखाद्या शिक्षकाची चित्रकला अथवा शिक्षकाचा अभिनय, शिस्त सुद्धा आपल्याला क्रांती घडवण्यासाठी प्रेरित करत असते असे ते म्हणाले. ग्रंथालय दिनाचे औचित्य साधून डॉ. एस आर रंगनाथन यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक मच्छिंद्र हापसे यांना जगविख्यात शास्त्रज्ञ हे पुस्तक भेट दिले. मच्छिंद्र हापसे म्हणाले की, पुस्तकेच विद्यार्थ्यांच्या आयुष्यात बदल घडवतात, क्रांती घडवितात. वाचन संस्कृती रुजविण्यासाठी शालेय अभ्यासा बरोबर विद्यार्थ्यांनी अवांतर वाचन केले पाहिजे असे ते म्हणाले. शिक्षक चंद्रशेखर कानडे , शिल्पा घनकुटे तसेच विद्यार्थी सानिका गायकवाड , विनायक वाळुंज, प्रज्ञा घोलप, सिद्धी नवले, आराध्य गुंजाळ यांंनी थोर हुतात्मे यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्राविण्या गोपाळे, गौरी कोठवळ, यांनी केले, प्रास्ताविक संस्कृती फटांगरे, परिचय तनिष्का कढणे तर आभार गुणश्री घुले हिने मानले. यावेळी क्रांती दिनाची संगीतमय गाणी सादर करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पर्यवेक्षक राजेंद्र थोरात, रंजना पवार, वैशाली कोल्हे, दर्शन जोशी आदिचे योगदान लाभले. यावेळी शिक्षकवृ़ंद , विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!