स्व.जगन्नाथ खामकर शिक्षण आणि कलेचा उपासक ; जुन्या पठडीतील शिस्तप्रिय शिक्षक

आपल्या अंगीभूत गुणांनी काही व्यक्तिमत्व समाजातील सर्वच क्षेत्रामध्ये समरस होवून जातात.आपल्या आवडीचे छंद जोपासताना त्याचा उपयोग माझ्या बरोबरच्या सहकार्याना कसा होईल यासाठीच त्यांची धडपड असते.कारण आपण ज्या पदापर्यत पोहचलो त्याचा अनुभव इतरांच्या यशासाठी व्हावा हा विचार करणारी एक पिढी शिक्षण क्षेत्रात योगदान देवून काम करीत होती.आशा पिढीचे प्रतिनीधीत्व करणारे व्यक्तिमत्व म्हणून निवृत मुख्याध्यापक स्व.जगन्नाथ खामकर यांच व्यक्तिमत्व सर्वाना परीचित होत.

मुळातच स्व.खामकर सरांची नाळ ग्रामीण भागाशी जोडलेली. जुन्या पठडीतील शिक्षक शिस्तप्रिय शिक्षक म्हणून त्यांची ओळख.त्यांच्या व्यक्तिमत्वाचा पिंडच शालेय जीवनापासून विविधांगी गुणांशी जोडलेला.पाथर्डी तालुक्यातील येळी त्यांचे जन्मगाव.पाथर्डी ते संगमनेर असा त्यांचा शैक्षणिक क्षेत्रातील प्रवास महत्वपूर्ण राहीला.प्राथमिक माध्यमिक शिक्षण घेतानाच आपल्या कुशाग्र बुध्दीमतेची चुणूक दाखवून त्यांनी स्वताचे व्यक्तिमत्व घडवले.शालेय जीवनापासून त्यांनी वाचन गायन वक्तृत्व सांस्कृतिक उपक्रमातून आपल्या अंगीभूत कलागुणांनाजीवनात त्यांनी आपले छंद म्हणून जोपासले.

शालेय महाविद्यालयीन जीवनात गुरूजनाकडून मिळवलेल्या संस्कारातून त्यांनी विद्यापीठाच्या युवक महोत्सवापासून ते आंतर विद्यापीठ महोत्सवापर्यत योगदान देण्याची संधी सरांना मिळाली.गायनाची आवड त्यांनी पहील्यापासूनच जोपसाली.सेवा दलातून मिळालेली संधी पुढे कलापथका पर्यत टिकवून ठेवत त्यांनी या कलेचा उपयोग स्वताच्या आनंदासाठी केलाच पण शैक्षणिक क्षेत्रासाठी त्याची उपयुक्तता त्यांनी जाणली.
पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासारा येथे उपशिक्षक म्हणून ज्ञानदानाच्या कार्याची केलेली सुरूवात ही उद्याची पिढी घडविण्यासाठीचे त्यांचे ध्येय होते.या ज्ञानयज्ञात लोकसहभाग असावा वाढविण्याच्या केलेल्या प्रयत्नाचे यश म्हणजे पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे उभारलेले ऐतिहासिक वास्तू संग्रलायाची इमारत आहे!

शिक्षण क्षेत्रात झपाटून काम करणे काय असते हे स्व.खामकर सरांनी आपल्या उक्ती आणि कृतीतून दाखवून दिले.मिळेल त्या पदाच आणि संधीच सोन करणे काय असते त्यांच्या कार्यातून जाणवते.शिक्षकीपेशा स्विकारून बीएडचे शिक्षण पूर्ण करताना माझा देश महान स्वताचा पहीला काव्य संग्रह प्रकाशित करून आपल्यातील कवी मनाची स्वतंत्र ओळख निर्माण करून दिली.
संगमनेर तालुक्यातील समता विद्या मंदीर येथे मुख्याध्यापक पदावर रुजू झाल्यानंतर जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्व.भाऊसाहेब थोरात यांच्याशी त्यांचा संपर्क आला.त्यांच्याकडून प्रेरणा घेत समता विद्या मंदीराच्या शैक्षणिक प्रगतीला नवी दिशा देण्याचा यशस्वी प्रयत्न केला.याच विद्यालयात सरांना दोन वेळेस मुख्याध्यापक पदाची संधी मिळाल्याने मागे वळून न पाहाता जोर्वे आणि परीसरात शैक्षणिक विस्ताराचा मोठा कार्यक्रम हाती घेतला.व्यायाम शाळेपासून ते कृषी शिक्षणाची सुविधा निर्माण करून विद्यार्थ्याना नव्या संधी उपलब्ध करून ग्रामीण भागातील पहील्या पालक संघाची स्थापना खामकर सरांनी करून विद्यार्थ्या समवेत पालकांना शिक्षणाच्या प्रवाहात जोडून घेतले.

आज जोर्वे येथील समता विद्या मंदीरचा झालेला विस्तार आणि विकास करण्यात स्व.खामकर सरांचे योगदान खूप मोठे आहे.शाळा चार भितींची न राहाता,उद्याची पिढी घडविण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्याना संधी निर्माण करून देण्यासाठी त्यांची धडपड सातत्याने राहीली.याचा परीणाम असा झाला की आज जोर्वे आणि परीसरातील अनेक विद्यार्थी यशस्वीपणे विविध क्षेत्रात कार्यरत आहेत.

ग्रामीण भागात पुर्वी शिक्षणाबाबत उदासनीता पाहायला मिळायची पण खामकर सरांनी हक्काने आणि दरडावून मुलांना शिकू द्या असे सांगणारे खामकर सर सर्वाना आपलेसे वाटले.
संगीत,परीपाठ, नित्यपाठ, भारतीय राष्ट्र ध्वज व इतिहास आणि संहीता ही सरांची प्रकाशित झालेली पुस्तक शिक्षण क्षेत्रासाठी मार्गदर्शक ठरली.पण यापुढे जावून मुख्याध्यापकांच्या संघटनेत अॅकेडमी सेक्रेटरी म्हणून काम करताना सांघिक उपक्रमातून नवे प्रवाह शिक्षण क्षेत्रात अधोरेखीत केले.

संगमनेर तालुक्याच्या सामाजिक चळवळीत सरांचे योगदान महत्वपूर्ण राहीले.स्व.भाऊसाहेब थोरात यांच्या सानिध्यामुळे सरांच्या अनेक उपक्रमांना प्रोत्साहन मिळाले.स्व.भाऊसाहेब थोरात यांच्या एकस्ष्टीच्या सोहळ्यातील नियोजनात सरांचा सहभाग तेवढाच उल्लेखनीय.जोर्वे गावात संपर्कासाठी फोन येण्यासाठी सरांनी केलेली धडपड आजही सर्वाच्या स्मरणात आहे.

साहीत्य आणि वाचनाचा व्यासंग असलेल्या खामकर सरांनी शैक्षणिक क्षेत्रासाठी निर्माण केलेली साहीत्य संपदा आठवणीत राहाणारी आहेच.पण यापेक्षाही संगीताच्या आवडीचे जोपासलेले पैलू त्यांच्या जीवनाचा आनंद होता!

