माफीयांच्या दहशतीपासून तालुका मुक्त करण्यासाठी माझी निवडणूक-अमोल खताळ
तालुक्यातील युवकांसाठी रोजगाराची उपलब्धता करणार
संगमनेर / लोकवेध live न्यूज
तालुक्याला यंदा परिवर्तन हवे असल्यामुळे यंदाच्या निवडणूकीत युवक सक्रीयपणे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहीले आहे. महायुती सरकारमुळे तालुक्यात उपलब्ध झालेला ६५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिल्याने जनतेला एक नवा विश्वास मिळाला आहे. या तालुक्याला आता वाळूमाफीया, एजंट माफीया आणि गावागावातील बगलबच्चांच्या दहशतीपासून मुक्त करायचे आहे. या माझ्या भूमिकेला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे माझा विजय निश्चित असल्याचा विश्वास महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांनी व्यक्त केला.
महायुतीच्या प्रचारार्थ अमोल खताळ यांनी पठार भागातील सर्व गावांमध्ये ग्रामंस्थांच्या भेटी घेवून त्यांना महायुतीला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. ठिकठिकाणी त्यांचे युवकांनी उत्फुर्तपणे स्वागत केले. निवडणूकीतील आपली भूमिका माध्यमांशी बोलताना अमोल खताळ यांनी स्पष्ट केली. एकाच कुटूंबात अनेक वर्षे सत्ता असल्यामुळे त्यांनी नेमका कोणाचा विकास केला, हा प्रश्न आता जनता उत्फुर्तपणे विचारत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
सर्व सत्तास्थाने ताब्यात असतानाही या तालुक्याचा पाणी प्रश्न सुटू शकला नाही. ज्या निळवंडे आणि भोजापूरच्या पाण्यावर अनेक वर्षे निवडणूका लढविल्या तो प्रश्न सुध्दा राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने सुटला. पठार आणि साकुर भागातील जनता अद्यापही पाण्याच्या प्रतिक्षेत आहे. या तालुक्याच्या आमदारांनी औद्योगिक वसाहतीमध्ये तीस हजार लोकांना रोजगार दिल्याचा केलेला दावा फसवा आणि अतिशय खोटारडेपणाचा आहे.
या तालुक्यातील युवकांना रोजगाराची गरज आहे. सात वर्षे महसूल मंत्री होते, औद्योगिक वसाहतीला जागा मिळू शकली नाही. अवघ्या दोन वर्षात ना.विखे पाटील यांनी जिल्ह्यातील तीन तालुक्यांना औद्योगिक वसाहतीकरीता जागा मिळवून दिली. आ.थोरातांची ही निष्क्रीयेता आता उघड झाल्याने युवक त्यांच्या बरोबर राहायला तयार नाहीत.
आरोग्याच्या बाबतही त्यांची उदासिनता स्पष्टपणे दिसून आली आहे. कॉटेज रुग्णालय बंद केल्यामुळे सामान्य माणसाचे हाल झाले. कुठल्याही उपचारांसाठी आता लोणीच्या प्रवरा रुग्णालयात लोकांना धाव घ्यावी लागते. अनेक वर्ष सत्ता आणि मंत्रीपद असतानाही एक मोठे रुग्णालय संगमनेरात होवू शकले नाही याचा जाब आता जनता त्यांना विचारणार आहे. तालुक्याला आता ठेकेदारांच्या, वाळू माफीयांच्या आणि गावागावातील बगलबच्चांच्या दहशतीपासून मुक्तता हवी असल्यानेच जनता आता गावोगावी एकत्रित येवून परिवर्तन करण्यास सिध्द झाली असल्याचा दावा अमोल खताळ यांनी केला.
