गगनगिरी विद्यालयात विद्यार्थिनींच्या सशक्तीकरणासाठी लाठी-काठी प्रशिक्षण उपक्रम संपन्न
पिंपरणे (ता. संगमनेर) : लोकवेध live न्यूज
प.पू. गगनगिरी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पिंपरणे येथे विद्यार्थिनींच्या स्वसंरक्षण व सशक्तीकरणासाठी लाठी-काठी प्रशिक्षण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम विद्यार्थिनी सुरक्षा समिती, सखी सावित्री समिती, शाळा व्यवस्थापन समिती आणि महिला तक्रार निवारण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आला.
आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत, प्राचार्य मा. श्री. आर. बी. वाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सद्गुरू कृपा गुरूकुल, कनोली येथील योग शिक्षक श्री. शिवप्रसाद वर्पे सर आणि त्यांचे सहकारी साई रमेश चोबे, अनिकेत संदिप मोरे, अत्रेस बाबासाहेब कांबळे यांनी विद्यार्थ्यांना लाठी-काठीचे विविध कौशल्यपूर्ण प्रकार शिकवले.
प्रशिक्षणात एका हाताने व दोन्ही हातांनी होडी चालवणे, बॅटिंग तंत्र, तसेच ‘शिवमुद्रा फाईट’ यासारख्या रक्षणात्मक शैलींचा समावेश होता. विद्यार्थिनींनी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेत प्रशिक्षणाचा लाभ घेतला.
संस्थेचे अध्यक्ष श्री. बापूसाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेमध्ये अशा उपक्रमांना नेहमीच प्रोत्साहन दिले जाते. प्राचार्य श्री. आर. बी. वाळे यांच्या हस्ते प्रशिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. बी. ललीत शेळके यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. एकनाथ विरकर यांनी केले. उपस्थित सर्व शिक्षकांनी उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.
