लालपरीत महिलांना आज पासून ५०% सवलत
महिला म्हणतात वाट पाहीन पण एसटीने जाईन
लोकवेध live न्यूज
‘वाट पाहीन पण एसटीने जाईन’ हे ब्रीदवाक्य अनेकदा आपल्या कानावर पडले असेल. ग्रामीण भागाची लाईफ लाईन म्हणून ‘लाल परी’ची ओळख आहे. महाराष्ट्रातील गाव खेड्यापर्यंत आज लाल परी पोहोचली आहे. ग्रामीण भागातील गोरगरीब प्रवाशांना या बसचा मोठा आधार आहे. नुकताच महाराष्ट्राचा अर्थसंकल्प जाहीर झाला. यामध्ये एसटी बसमध्ये महिलांना तिकिटात 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला.
आज शुक्रवार पासून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस मधून महिलांना प्रवास भाड्यात पन्नास टक्के सवलत दिली जाणार आहे, तसा आदेश शासनाने राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने जारी केला आहे.सध्या सुरू असलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध योजनांचा अक्षरशः पाऊस पाडला. शेतकरी,महिला यासह विविध जातींना आर्थिक विकास महामंडळाची अक्षरशः खैरात करण्यात आली. अनेक योजनांची घोषणा करत कोट्यवधींचा निधी प्रस्तावित करण्यात आला. यात महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस मधून प्रवास भाड्यात चक्क पन्नास टक्के सवलत घोषित करण्यात आली. या घोषणेचे सर्वस्तरातून स्वागत करण्यात आले, मात्र निर्णय घोषित केला असला तरी त्याची अंमलबजावणी कधी होणार या बद्दल स्पष्टता शासना कडून जारी करण्यात आली नव्हती. दरम्यान अनेक महिलां या एसटीतुन प्रवासा दरम्यान कंडक्टर बरोबर ५० टक्के सवलती साठी वाद घालताना दिसल्या. याबाबतचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. दरम्यान शासनाने याची दखल घेत आज दिनांक १७ मार्च पासून या निर्णयाची अमलबजवणी करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाने तसे आदेश एसटी महामंडळाला जारी केले आहेत. या सवलती मुळे महामंडळाचा होणाऱ्या तोट्याची भरपाई शासनाकडून दिली जाणार आहे. महिला वर्गातून या निर्णयाचे स्वागत होत आहे
