“आईच्या प्रेमासाठी… टाकळी शाळेत हिरवाईचा संकल्प!”

‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम उत्साहात साजरा • २५० रोपांचे वितरण • विद्यार्थ्यांकडून वृक्षदिंडी व जनजागृती फेरी

अकोले / लोकवेध live न्यूज

“आई” या शब्दाशी जोडलेला भावनिक धागा आणि पर्यावरण रक्षणाची जबाबदारी यांचा सुंदर संगम ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमातून टाकळी शाळेत अनुभवायला मिळाला. जिल्हा परिषद केंद्रशाळा टाकळी व ग्रामपंचायत टाकळी यांच्या संयुक्त विद्यमाने २५० विविध प्रजातींच्या झाडांची रोपे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आली.

या उपक्रमात चिंच, आंबा, वावळा, निलमोहोर, सावर, पिंपळ, लिंब, शिसवद या वृक्षांचे रोपे विद्यार्थ्यांच्या हाती सुपूर्त करताना पर्यावरण संतुलन आणि निसर्ग प्रेमाचे बीज त्यांच्या मनात पेरले गेले.

कार्यक्रमाचे प्रमुख समन्वयक ग्रामसेवक एस.डी. हासे यांनी मुलांशी संवाद साधत वृक्षारोपणाचे दीर्घकालीन फायदे स्पष्ट केले. मुख्याध्यापक डॉ. श्रीनिवास पोतदार यांनी “झाडांचे संगोपन म्हणजेच आपल्या भविष्यासाठी केलेली गुंतवणूक” असे सांगत निगा राखण्याचे कौशल्य विद्यार्थ्यांना शिकवले.

सहशिक्षक संजय देशमुखदत्तात्रय देवगिरे आणि निता लेंभे यांनी “झाडे लावा, झाडे जगवा” या घोषणेचा अर्थ विद्यार्थ्यांच्या मनात खोलवर रुजवला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी गावातून काढलेली वृक्षदिंडी आणि जोरदार घोषणांनी भरलेली जनजागृती फेरी गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेत होती. प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात रोप आणि हृदयात हरित विचार दिसून येत होता.

उपक्रमाचे आभार प्रदर्शन करत उपाध्यापक संजय शिंदे यांनी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्य मंडळाचे मन:पूर्वक आभार मानले.

या उपक्रमाचे गटशिक्षणाधिकारी अरविंद कुमावतशिक्षण विस्तार अधिकारी अनिल गायकवाड व केंद्रप्रमुख रोहिणी खतोडे यांनी विशेष कौतुक करत, “ही मुलेच उद्याची हिरवी शपथ असतील” असा विश्वास व्यक्त केला.


या उपक्रमातून ‘आई’प्रती आदर व्यक्त करताना पर्यावरण संवर्धनाची अमूल्य शिकवण मिळाली. हिरवळ निर्माण करतानाच संवेदनशील पिढी घडवण्याचा टाकळी शाळेचा हा पवित्र प्रयत्न निश्चितच स्तुत्य ठरतो आहे. 🌿🌍💚

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!