विद्यार्थ्यांनो! अण्णाभाऊ, टिळकांसारख्या थोरांची जीवनगाथा वाचा… आणि स्वतःचं भविष्य घडवा! – स्तंभलेखक सुरेश मंत्री यांचे आवाहन
अंबाजोगाई / लोकवेध live न्यूज
– “विद्यार्थ्यांनी थोर व्यक्तींच्या जीवनचरित्रातून प्रेरणा घेत स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करावा, हेच खरे त्यांना दिलेले अभिवादन ठरेल,” असे प्रतिपादन सुप्रसिद्ध स्तंभलेखक सुरेश मंत्री यांनी केले.
देवळा येथील विश्वरुपी माध्यमिक विद्यालयात आयोजिलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी निमित्त विशेष कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एस. जे. खोसे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून भरत महाराज खामकर आणि रविंद्र देवरवाडे यांची उपस्थिती होती.
या प्रसंगी बोलताना सुरेश मंत्री म्हणाले, “टिळकांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या आयुष्याचा त्याग केला, तर अण्णाभाऊंनी श्रमिक, दलित व वंचित समाजाच्या वेदनांना लेखणीच्या माध्यमातून आवाज दिला. त्यांच्या जीवन संघर्षातून शिकून विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवायला हवेत.”
तसेच, त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, “मोबाईल, सोशल मीडियाच्या आहारी न जाता वाचन, चिंतन व सामाजिक भान जपणे गरजेचे आहे. जीवनात मोठं होण्यासाठी केवळ गुणांपेक्षा विचार मोठे हवेत.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. अक्षरा आगळे हिने केले. सूत्रसंचालनाची जबाबदारी कु. स्नेहल गायकवाड आणि कु. ऋतुजा कदम यांनी समर्थपणे पार पाडली. कार्यक्रमाच्या शेवटी कु. आरती साळुंके हिने उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमास शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रेरणादायी कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनात थोर नेत्यांच्या कार्याबद्दल आदर व त्यांच्याप्रमाणे जीवन जगण्याची प्रेरणा निर्माण झाली, हे विशेष.
