स्वातंत्र्यसंग्रामातील क्रांतिकारकांचा आवाज बनली भाग्यश्री!
देवळा गावच्या गुणवंत मुलीचा वक्तृत्वात झंझावात… द्वितीय क्रमांकासह राज्यस्तरीय यश

अंबाजोगाई / लोकवेध live न्यूज / सुरेश मंत्री

देवळा गावची आणि विश्वरुपी माध्यमिक विद्यालयाची तेजस्वी विद्यार्थिनी कु. भाग्यश्री सगट हिने आपल्या प्रभावी आणि ज्वलंत भाषणाने संपूर्ण स्पर्धा गाजवत द्वितीय क्रमांक पटकावला. २९ जुलै २०२५ रोजी वरवटी येथील वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालयात पार पडलेल्या वक्तृत्व स्पर्धेत “भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एका क्रांतिकारकाचे योगदान” या विषयावर तिने बोलतांना आपल्या ओजस्वी विचारांनी उपस्थितांची मने जिंकली.

भाग्यश्रीचे वक्तृत्व फक्त अभ्यासपूर्ण नव्हते, तर त्यामध्ये राष्ट्रभक्ती, आत्मविश्वास, आणि क्रांतिकारकांच्या बलिदानाची ठिणगी प्रकट होत होती. तिच्या भाषणातील प्रभावामुळे परीक्षकांनी तिला द्वितीय क्रमांकासह रु. ३०००/- चे पारितोषिक देऊन गौरवले.

या यशामागे शाळेतील शिक्षक हनुमंत आपेट यांचे मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे ठरले. तिच्या यशाबद्दल संस्थेचे सचिव राजेंद्र लोमटे, उपाध्यक्ष सतीश लोमटे, मुख्याध्यापक खोसे एस.जे., तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि ग्रामस्थांनी भाग्यश्रीवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

भाग्यश्रीने आपल्या कर्तृत्वाने शाळेचा आणि गावाचा नावलौकिक उंचावला असून, तिच्या पुढील वाटचालीसाठी सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तिचे हे यश नवोदित विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!