“दहा मिनिटांत १८५ राख्या… लहान हातांनी दिला बंधुत्वाचा सुंदर संदेश”
पोखरी हवेली शाळेत उत्स्फूर्त राखी बनविण्याची कार्यशाळा
संगमनेर / लोकवेध live न्यूज
तालुक्यातील पोखरी हवेली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राखी बनविण्याची आगळीवेगळी कार्यशाळा नुकतीच रंगतदार वातावरणात संपन्न झाली. सेवानिवृत्त कलाशिक्षक देविदास गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या दहा मिनिटांत इयत्ता पहिली ते सातवीच्या १८५ विद्यार्थ्यांनी १८५ आकर्षक राख्या तयार करून सगळ्यांचेच लक्ष वेधले.
कार्यशाळेच्या सुरुवातीला गोरे सरांनी वीस गटनायकांना राखी बनविण्याचे प्रात्यक्षिक दाखवून सविस्तर मार्गदर्शन केले. तत्काळ गटनायकांनी आपल्या गटातील सर्व विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी एक राखी तयार करून घेतली. मुलांनी रंगीबेरंगी धागे, मणी, चमचमणारे तुकडे वापरून राख्या इतक्या सुंदर बनवल्या की त्या पाहून पालकांच्या डोळ्यांतही आनंद झळकला.
या उपक्रमाने विद्यार्थ्यांना केवळ कलाकौशल्याचा आनंदच दिला नाही, तर बंधुत्व, आपुलकी, संस्कार आणि स्वावलंबनाचा मोलाचा धडाही दिला. बाजारातून विकत आणण्यापेक्षा स्वतःच्या हातांनी बनविलेली राखी अधिक जिव्हाळ्याची असते, हा संदेश या लहानग्यांनी आपल्या कृतीतून दिला.
या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक एकनाथ साबळे, शिक्षक शिवाजी नरवडे, सुरेश साळुंके, शकुंतला शेळके, दस्तगीर शेख, सखाराम पाटील, राजेंद्र सूर्यवंशी आणि सोनाली बागुल यांनी विशेष मेहनत घेतली
