“गोडसे च्या नावाखाली धमक्या…! संग्राम भंडारे महाराज जनतेच्या रोषाच्या जाळ्यात”
थोरात साहेबांना जिवे मारण्याची उघड धमकी; जोर्वे ग्रामस्थांचा संताप अनावर
द्वेष, दहशत आणि चिथावणीचे राजकारण सहन करणार नाही – प्रशासनाने तात्काळ कठोर कारवाई करावी
संगमनेर / लोकवेध live न्यूज
तथाकथित महाराज संग्राम भंडारे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री व आमदार बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात केलेल्या “आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल” या धक्कादायक वक्तव्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. हे वक्तव्य केवळ भडकाऊ नसून थोरात साहेबांना जिवे मारण्याची उघड धमकी म्हणून पाहिले जात आहे.
भंडारे वारंवार थोरात कुटुंबीय व समर्थकांविरुद्ध विषारी, चिथावणीखोर विधाने करत असून समाजात दहशत आणि वैमनस्याचे वातावरण निर्माण करण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न करीत आहेत. लोकशाही व्यवस्थेचा गळा घोटणाऱ्या या भडकाऊ प्रवृत्तींवर गुन्हा दाखल करून कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी जनतेची तीव्र मागणी आहे.
जोर्वे गावातील ग्रामस्थांनी या विषारी वक्तव्यांचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. यंदाच्या बैलपोळा सणात आपल्या लाडक्या बैलांच्या अंगावर “भंडारे महाराजांचा जाहीर निषेध” अशा घोषणा लिहून ग्रामस्थांनी गावभर मिरवणूक काढली. पोळ्याच्या उत्सवातून संतापाचा ज्वालामुखी व्यक्त करत ग्रामस्थांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील जनता सजग असून, कुणीही धार्मिक वा राजकीय कारणांनी समाजात गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना थारा दिला जाणार नाही. प्रशासनाने तातडीने कारवाई करत भंडारे यांना कायद्याच्या कचाट्यात आणले पाहिजे, अशी एकमुखाने मागणी जिल्ह्यातून जोर धरू लागली आहे.
