सहकार विकास मंडळाचा उपक्रम : पिंपरणेत ‘एक गाव एक गणपती’ स्थापनेने गावात भक्तिभावाचे वातावरण
पिंपरणे / लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथे सहकार विकास मंडळाच्या वतीने ‘एक गाव एक गणपती’ उपक्रमांतर्गत गणरायाची स्थापना मोठ्या उत्साहात करण्यात आली. बुधवारी सायंकाळी सात वाजता भव्य मिरवणुकीच्या माध्यमातून गणपती बाप्पाची मूर्ती गावातील छत्रपती चौक येथे आणण्यात आली. पारंपरिक वाद्यांच्या गजरात, जयघोषात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत गणपती बाप्पाचे स्वागत करण्यात आले.
गणपती बाप्पाची मूर्ती छत्रपती चौकात विधीपूर्वक स्थापित करून पूजा-अर्चा करण्यात आली. यावेळी गावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या पाच जोड्यांनी प्रमुख पूजेसाठी सहभाग घेतला. धार्मिक वातावरणात झालेल्या या पूजनामुळे गावकऱ्यांमध्ये भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले.
गणरायाच्या आगमनाने संपूर्ण गावात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, येत्या दहा दिवसांत दररोज विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळ-संध्याकाळ आरती, तसेच लहान मुलांसाठी खेळ, महिलांसाठी विविध स्पर्धा अशा उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे.
गावाच्या मुख्य रस्त्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून, छत्रपती चौक गणेशमूर्तीच्या सौंदर्याने उजळून निघाला आहे. एक गाव एक गणपती या उपक्रमामुळे गावातील सर्व समाजघटकांना एकत्र येऊन उत्सव साजरा करण्याची संधी मिळाली आहे. एकात्मता, भक्तीभाव आणि सामाजिक बांधिलकी यांचा अनोखा संगम घडवून पिंपरणे ग्रामस्थांनी गणेशोत्सवाचे पर्व मोठ्या भक्तिभावात सुरू केले आहे.
