पिंपरणे ग्रामपंचायतीत प्रथमच गणरायाची स्थापना : सरपंच नारायण मरभळ यांच्या हस्ते धार्मिक सोहळा

संगमनेर  / लोकवेध live न्यूज

 

गणपती बाप्पा मोरया या घोषणांनी पिंपरणे ग्रामपंचायतीचा परिसर मंगलमय झाला. यावर्षी प्रथमच ग्रामपंचायतीच्या वतीने गणरायाची स्थापना करण्यात आली असून हा सोहळा ग्रामपंचायत सरपंच नारायण मरभळ यांच्या शुभहस्ते पार पडला. यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गावाच्या विकासासाठी अथक परिश्रम घेणारे आणि धार्मिक तसेच सामाजिक कार्यात नेहमी आघाडीवर असलेले सरपंच नारायण मरभळ हे नाव ग्रामस्थांच्या मनात विशेष विश्वासाने घेतले जाते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत कार्यालयात प्रथमच गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली. यापूर्वी ग्रामपंचायत स्तरावर अशी परंपरा नव्हती. मात्र, “ग्रामपंचायत ही केवळ विकासकामांची धुरा वाहणारी संस्था नसून गावकऱ्यांच्या श्रद्धा, परंपरा आणि संस्कृतीला जोडणारे केंद्रही असावे,” या विचारातून सरपंचांनी हा उपक्रम हाती घेतला.

गणेश मूर्तीची स्थापना झाल्यानंतर विधिवत पूजा, मंत्रोच्चार आणि शंखनादाच्या गजरात वातावरण भारावून गेले. यानंतर सरपंच नारायण मरभळ यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली. या क्षणी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. धार्मिक सोहळ्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयाला भक्तिमय रूप प्राप्त झाले होते.

या प्रसंगी सरपंच नारायण मरभळ यांच्यासोबत ग्रामपंचायत सदस्य उत्तम नाना राहिंज, धनंजय वाकचौरे, निलेश बागुल, पोलीस पाटील विनोद साळवे, कल्याण जोर्वेकर, शुभम काळे, धनंजय देशमुख,अविनाश खंडागळे, प्रदीप मांडे, नितीन बागुल, सूर्यकांत साळवे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी गणरायाच्या दर्शनाचा लाभ घेत गावाच्या प्रगतीसाठी मंगलकामना व्यक्त केल्या.

ग्रामपंचायतीच्या इतिहासात प्रथमच झालेल्या या धार्मिक उपक्रमामुळे ग्रामस्थांत समाधानाचे वातावरण आहे. “गणरायाच्या आशीर्वादाने गावात ऐक्य वाढेल, विकासाची गती अधिक वेगाने पुढे जाईल,” असा विश्वास गावकऱ्यांनी व्यक्त केला.

सामाजिक, धार्मिक आणि विकासात्मक अशा सर्वच क्षेत्रांत कार्याचा ठसा उमटविणारे सरपंच नारायण मरभळ यांनी गावाला दिलेला हा नवा धार्मिक वारसा भविष्यात प्रेरणादायी ठरेल, असे मत व्यक्त केले जात आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!