अंभोरे येथे वीरभद्र बिरोबा महाराजांचा जलाभिषेक
मा. रणजितसिंह देशमुख : “श्रद्धा व भक्ती हीच खरी ताकद”
संगमनेर / लोकवेध live न्यूज
कोपरगाव येथील पवित्र गोदावरी गंगा नदीतून कावडीत आणलेले पाणी घेऊन, भक्तांच्या उत्साहात व सवाद्य मिरवणुकीत अंभोरे येथे वीरभद्र (बिरोबा) महाराजांचा जलाभिषेक सोहळा शनिवारी मोठ्या भक्तिभावाने पार पडला. या भक्तीमय सोहळ्यास संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे चेअरमन मा. श्री. रणजितसिंह देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
पहाटेपासूनच गावात भक्तांची गर्दी उसळली होती. कोपरगाव येथून अनवाणी पायी कावडीत गंगा जल आणणाऱ्या भाविकांनी गावात प्रवेश करताच, ढोल-ताशांच्या गजरात आणि जयजयकारांच्या घोषणांनी वातावरण भारावून गेले. मिरवणुकीनंतर पवित्र गंगाजलाने वीरभद्र बिरोबा महाराजांचा जलाभिषेक करण्यात आला.
भाविकांना मार्गदर्शन करताना मा. रणजितसिंह देशमुख म्हणाले,
“महाराष्ट्र ही संत, साधु-पुरुषांची पवित्र भूमी आहे. आपली हिंदू संस्कृती देवाविषयी अखंड श्रद्धा ठेवणारी आहे. वीरभद्र बिरोबा महाराज हे जागृत देवस्थान असून, भाविकांची त्यांच्या प्रति अपार आस्था आहे. अनेक भक्त कोपरगाव येथून गंगाजल अनवाणी पायी आणतात, हीच खरी भक्तीची ताकद आहे. म्हणूनच यात्रेत कोणताही त्रास जाणवत नाही – हे केवळ महाराजांच्या कृपेचे आणि भक्तांच्या निष्ठेचे फल आहे.”
या वेळी गावातील स्थानिक संस्थांचे पदाधिकारी, पंचक्रोशीतील मान्यवर, महिला, पुरुष व तरुण भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमात श्रद्धा, भक्ती व उत्साहाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.
