राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची उपसरपंच कै. सर्जेराव ठोंबरे यांच्या कुटुंबीयांना भेट – पिंपरणे गाव शोकाकुल
पिंपरणे / लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुक्यातील पिंपरणे गावातील उपसरपंच कै. सर्जेराव एकनाथ ठोंबरे यांचे शनिवार दिनांक ३० ऑगस्ट रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने गावातील एक आदर्श व्यक्तिमत्व हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. साधेपणाने जीवन जगणारे, गावाच्या विकासासाठी सदैव तत्पर राहणारे आणि समाजातील प्रत्येक घटकांशी जिव्हाळ्याने वागणारे म्हणून सर्जेराव ठोंबरे यांची ओळख होती.
त्यांच्या निधनाची वार्ता समजताच गावात शोककळा पसरली. ठोंबरे यांनी आपल्या कार्यकाळात गावातील पायाभूत सुविधा, सामाजिक-सांस्कृतिक उपक्रम, तसेच शेतकरी बांधवांच्या प्रश्नांकडे नेहमीच संवेदनशीलतेने पाहिले. लोकांच्या दुःखात-दुःखात धावून जाणारे आणि सदैव मदतीस तयार राहणारे असे त्यांचे व्यक्तिमत्व गावकऱ्यांना आजही आठवते.
कै. ठोंबरे यांचे सुपुत्र भागवत सर्जेराव ठोंबरे हे सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रात सदैव पुढाकार घेतात. त्यामुळे त्यांच्या निवासस्थानी रोज विविध क्षेत्रातील मान्यवर भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन करत आहेत. सोमवार दिनांक १ सप्टेंबर रोजी राज्याचे माजी महसूल मंत्री तथा लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी पिंपरणे येथे त्यांच्या निवासस्थानी भेट देत भागवत ठोंबरे व त्यांच्या परिवाराशी संवाद साधून त्यांचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख तसेच स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाळासाहेब थोरात साहेबांनी ठोंबरे कुटुंबाला धीर देताना सांगितले की, “सर्जेराव ठोंबरे हे समाजहितासाठी नेहमी कार्यरत होते. त्यांचे व्यक्तिमत्व साधेपणाचे व सर्वांना आधार देणारे होते. त्यांच्या निधनाने समाजाचे मोठे नुकसान झाले असून ही पोकळी लवकर भरून निघणारी नाही.”
गावातील वयोवृद्ध व्यक्तींना त्यांनी मुलासारखे जपले, तरुणांना दिशा दिली, तर कुटुंबाकडेही त्यांनी संवेदनशीलतेने लक्ष दिले. म्हणूनच त्यांच्या निधनानंतर गावातील प्रत्येक घर शोकमग्न झाले आहे.
ठोंबरे कुटुंबाचे हे दुःख वाटून घेण्यासाठी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रातील मान्यवर पिंपरणे येथे भेट देत आहेत. गावातील वातावरण गंभीर असून ठोंबरे यांच्या स्मृती जागवणाऱ्या आठवणी सर्वत्र व्यक्त होत आहेत.
कै. सर्जेराव ठोंबरे यांच्या निधनाने गावाला एक प्रेमळ मार्गदर्शक, संवेदनशील समाजकारणी व खरी माणुसकी जपणारा नेता गमावल्याची भावना गावकरी आजही व्यक्त करत आहेत. त्यांचे कार्य व आदर्श येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
