जिद्दी खेळाडूंचा विजयश्रीचा झेंडा – हरिभाऊ सांगळे विद्यालयाचा तालुक्यात गाजलेला कबड्डीचा विजय
संगमनेर (प्रतिनिधी) –
ग्रामीण भागातील मुलांना योग्य संधी आणि मार्गदर्शन मिळाले, तर ते कोणत्याही पातळीवर आपले कौशल्य दाखवू शकतात याचे जिवंत उदाहरण निमोण गावातील हरिभाऊ सांगळे यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने घडवून दाखवले आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद अहिल्यानगर, तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय संगमनेर व शारीरिक शिक्षक संघटना संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत या विद्यालयाच्या १९ वर्षाखालील मुलांच्या संघाने अंतिम सामन्यात धमाकेदार विजय मिळवून विजेतेपद पटकावले.
उत्कंठावर्धक अंतिम सामना
चंदनापुरी येथील इनोव्हेटर्स पब्लिक स्कूलच्या भव्य मैदानावर झालेल्या स्पर्धेत पहिल्या लढतीत अकलापूरला पराभूत करून निमोण विद्यालयाने आपली ताकद दाखवली. त्यानंतर निकराच्या अंतिम सामन्यात संगमनेर कॉलेजच्या संघाशी सामना झाला. संपूर्ण मैदानावर प्रचंड उत्सुकता आणि तणावाचे वातावरण असताना, संघनायक रोहित सचिन मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली खेळाडूंनी जबरदस्त जिद्द, एकजुटीने केलेला बचाव आणि दमदार चढाया यामुळे हरिभाऊ सांगळे विद्यालयाने विजयी झेंडा फडकावला.
कौशल्याने चमकलेले खेळाडू
संघाचा कर्णधार रोहित मंडलिक याच्यासह अजय माळी, प्रथमेश गायकवाड, हर्षद घुगे, समाधान आव्हाड, प्रशांत पवार, सिफान अत्तार, समाधान गुळवे व सार्थक बोंद्रे यांनी कौशल्यपूर्ण खेळ सादर केला. प्रत्येक खेळाडूने आपल्या जबाबदारीचे सोनं करत संघाला विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.
मार्गदर्शनाची भक्कम साथ
या यशात क्रीडाशिक्षक अशोक कांडेकर व सुनील पवार यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. सतत दिलेले प्रेरणादायी शब्द आणि केलेल्या कसून प्रशिक्षणामुळेच मुलांनी आपले सामर्थ्य सिद्ध केले.
अभिनंदनाचा वर्षाव
या विजयानंतर विद्यालयाच्या कबड्डी संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून संपूर्ण निमोण गावात आनंदाचे वातावरण आहे. या यशस्वी खेळाडूंना लोकनेते, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, विधान परिषद सदस्य आमदार सत्यजित तांबे, सह्याद्री संस्थेचे चेअरमन व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, सेक्रेटरी सुमंत कोल्हे, संस्थेचे खजिनदार व स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन ॲड. ज्ञानेश्वर सांगळे, ज्येष्ठ नेते बी. आर. चकोर, रजिस्ट्रार उमेश डोंगरे, स्कूल कमिटी सदस्य अनिल शिवाजी घुगे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोरख घुगे, अनिल बबन घुगे, प्राचार्य सुदाम गोर्डे, पर्यवेक्षक बाळासाहेब पिंगळे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.
