“संगमनेर जिल्हा तात्काळ सुरू करा; अन्यथा करो किंवा मरो आंदोलन – आत्माराम देशमुखांचा इशारा”
संगमनेर / लोकवेध live न्यूज
अहिल्यानगरच्या बरोबरीचे संगमनेर असून, संगमनेर तालुक्याला जिल्ह्याचा दर्जा तात्काळ द्यावा, दीर्घकाळापासून प्रलंबित असलेला हा प्रश्न आता अधिक रेंगाळवून चालणार नाही, असा ठाम पवित्रा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आत्माराम देशमुख यांनी घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना सादर केलेल्या निवेदनात त्यांनी जिल्हा निर्मितीसोबतच महत्त्वाच्या शासकीय प्रकल्पांची मागणी केली आहे.
देशमुख यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, संगमनेर हे पुणे–नाशिक–मुंबई–अहिल्यानगरच्या मध्यभागी वसलेले ऐतिहासिक शहर असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातसुद्धा संगमनेर उपपरगणा होता. त्रिवेणी संगमावर वसलेले हे शहर आज महाराष्ट्रातील सर्वात वेगाने वाढणारा तालुका म्हणून ओळखला जातो. त्यामुळे संगमनेर जिल्हा घोषित करणे हा काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यासोबतच देशमुख यांनी संगमनेर येथे “छत्रपती शिवाजी महाराज शासकीय वैद्यकीय (एमबीबीएस) महाविद्यालय” मंजूर करावे आणि त्याला संलग्न शासकीय जिल्हा रुग्णालय उभारावे, अशी ठाम मागणी केली आहे. या सुविधांमुळे गोरगरिब, शेतकरी व आदिवासी समाजाला शिक्षण आणि आरोग्य या दोन्ही क्षेत्रांत मोठा दिलासा मिळेल, असे ते म्हणाले.
सरकारने जर जिल्हा निर्मितीच्या प्रश्नावर मनमानी, हुकूमशाही किंवा पक्षपातीपणा दाखविला, तर “करो किंवा मरो” गांधीजींच्या तत्वावर आधारित उपोषण मुख्यमंत्री कार्यालयातच सुरू केले जाईल, असा थेट इशारा देशमुख यांनी दिला. “हीच आमची शेवटची नोटीस समजावी,” असा कडक इशारा देत त्यांनी जिल्हा निर्मिती लांबविणाऱ्या शासनव्यवस्थेवर ताशेरे ओढले.
संगमनेर जिल्ह्याची मागणी अनेक दशकांपासून प्रलंबित आहे. परंतु आता हा प्रश्न अधिक वेळ दवडल्यास, मोठ्या जनआंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा निर्धार देशमुख यांनी स्पष्ट केला आहे.
