बौद्ध विहार बौद्ध समाजाच्या ताब्यात असावेत – संगमनेरात निवेदन

संगमनेर / लोकवेध live न्यूज

भारतीय बौद्ध महासभा संगमनेर शहर व तालुक्याच्या वतीने “महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन” अंतर्गत प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यात देशभरातील बौद्ध विहारांचा कारभार बौद्ध धर्मियांच्या ताब्यात असावा, अशी ठाम मागणी करण्यात आली.

निवेदन सादर करताना शहराध्यक्ष विनय घोसाळे, सरचिटणीस सचिन साळवे, रवी दिवे, बाबा मोकळ, निलेश कुसरे, अमोल कदम यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी महाबोधी विहाराचे ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व अधोरेखित करत संविधानाने दिलेल्या धर्मस्वातंत्र्याचा मुद्दा पुढे केला.

विहारांच्या कारभारात बाह्य हस्तक्षेपामुळे बौद्ध समाजाच्या धार्मिक भावनांना धक्का पोहोचत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. त्यामुळे शासनाने तातडीने निर्णय घेऊन बौद्ध धर्मियांच्या ताब्यात विहारांचे व्यवस्थापन द्यावे, अशी मागणी करण्यात आली.

शहराध्यक्ष विनय घोसाळे यांनी सांगितले की, “आपल्या धर्मस्थळांवर इतरांचा हस्तक्षेप कुणालाही मान्य नाही. विहार बौद्धांच्या ताब्यात आलेच पाहिजेत.” तर सरचिटणीस सचिन साळवे यांनी शासनाने सकारात्मक पावले उचलली नाहीत तर मोठ्या आंदोलनाचा इशारा दिला.

निवेदन सादर करताना कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. संगमनेर तालुक्यातील बौद्ध बांधव या लढ्यासाठी सज्ज असल्याचे स्पष्ट दिसून आले. शासनाने योग्य निर्णय घेऊन धार्मिक सौहार्द अबाधित ठेवावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!