भावनांचा महापूर – निरोप व स्वागत सोहळ्यात डोळ्यांत अश्रू, हृदयात कृतज्ञता
अकोले / लोकवेध live न्यूज
शिक्षक-विद्यार्थी नातं हे केवळ शिक्षणापुरतं मर्यादित नसतं, ते हृदयाला भिडणारं, जीवनाला दिशा देणारं असतं. त्याचेच प्रत्यंतर टाकळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सोमवारी भरलेल्या निरोप व स्वागत सोहळ्यात आले. या प्रसंगी संपूर्ण वातावरण भावनांनी भारावून गेले, डोळ्यांतून अश्रूंची धार अनावर झाली.
बदलीने कार्यमुक्त झालेले मा. श्री. संजय रामनाथ शिंदे सर (नांदुरी दुमाला, ता. संगमनेर) यांना विद्यार्थ्यांनी पुष्पवृष्टी करून निरोप दिला. शिंदे सरांवरील प्रेम व्यक्त करताना लहान मुलांचे गाल अश्रूंनी भिजले. संयोजन समिती व ग्रामस्थांकडून सरांना मानपत्र देऊन गौरविण्यात आले. विशेष म्हणजे शिंदे सरांनी आपल्या विद्यार्थ्यांवर अखेरपर्यंत आपुलकीचा वर्षाव करत सर्वांना जिलेबीचे गोड मिष्टान्न भोजन दिले. सरांच्या शैक्षणिक कार्याविषयी बोलताना अनेकांचे मनोगत अश्रूंनी दाटून आले.
याच वेळी बदलीने टाकळी केंद्रशाळेत रूजू झालेल्या मा. श्रीमती संगिता पांडुरंग धिंदळे मॅडम यांचेही विद्यार्थ्यांनी पुष्पवृष्टी करून भव्य स्वागत केले. नागरी सन्मानाच्या माध्यमातून ग्रामस्थांनी आपल्या नवीन अध्यापकाचे सहर्ष स्वागत करत शाळेच्या परंपरेत नवा अध्याय जोडला.
या अनोख्या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी मा. श्री. अनिल गायकवाड, केंद्रप्रमुख श्रीमती खतोडे, कृषी उत्पन्न बाजार समिती अकोलेचे सभापती भानुदास तिकांडे, विशेष शिक्षक कैलास झोळेकर, माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शुभांगी साबळे, अंगणवाडी सेविका विद्या तिकांडे, सेवानिवृत्त मेजर भाऊसाहेब दिघे, सरपंच दत्तुभाऊ गरूड ,शाळा व्यवस्थापन सदस्य कार्यकारिणी श्री.बाळासाहेब फोडसे, डॉ. जनार्दन मोरे, रामहरी तिकांडे, नानासाहेब गायकवाड, पोपटराव शेवाळे, दत्ताराम दातखिळे, संतोष तिकांडे, विजय दातखिळे, बाळु शिळकंदे, दादा पाटील तिकांडे, संतोष नाईकवाडी, रोहिणी पवार, अलका गांगड यांच्यासह ग्रामस्थ, पालक, व्यवस्थापन समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टाकळी केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी वेळ काढून सत्कारमूर्तींना सन्मानित करत शुभेच्छा दिल्या. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळीचे मुख्याध्यापक डॉ. श्रीनिवास पोतदार, सहकारी शिक्षक दत्तात्रय देवगिरे, संजय देशमुख, श्रीमती संगिता धिंदळे व निता लेंभे यांच्या परिश्रमामुळे यशस्वी झाले.
कार्यक्रमाचा समारोप करताना उपस्थित मान्यवरांनी एकमुखाने शिंदे सरांच्या कार्याची उजळणी केली आणि धिंदळे मॅडम यांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला. भावनांचा महापूर ओसंडून वाहणाऱ्या या अनोख्या निरोप व स्वागत समारंभाची आठवण गावकऱ्यांच्या मनात कायमची कोरली गेली
