अगोदर जिल्हा विभाजन, मगच निवडणुका — आत्माराम देशमुख यांची मुख्यमंत्रींकडे ठाम मागणी
अहिल्यानगर : लोकवेध live न्यूज
अहिल्यानगर जिल्ह्याचे नामांतर झाले असले तरी अद्याप प्रत्यक्ष जिल्हा विभाजनाची प्रक्रिया सुरू झालेली नाही. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते आत्माराम देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर निवेदन पाठवून ठाम मागणी केली आहे की, “अगोदर जिल्ह्याचे विभाजन करा, मगच जिल्हा परिषद, पंचायत समिती व इतर निवडणुका घ्या.”
देशमुख यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, अहिल्यानगर जिल्हा हा राज्यातील सर्वात मोठा आक्राळ विक्राळ जिल्हा असून कित्येक राज्यांना लाजवेल एवढा मोठा जिल्ह्यांपैकी एक असून सुमारे १७ हजार ५०० चौरस किलोमीटर एवढ्या मोठ्या क्षेत्रफळामुळे जनतेची व प्रशासनाची मोठी ससेहोलपट होत आहे. इतक्या विशाल भूभागात प्रशासन शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत नाही, परिणामी विकासकामांना गती मिळत नाही.
त्यांनी पुढे नमूद केले की, जिल्हा विभाजन हे केवळ प्रशासनिक सोयीसाठीच नव्हे तर सर्वांगीण विकासासाठी अत्यावश्यक झाले आहे. विभाजनामुळे लोकांपर्यंत शासनाच्या योजना वेळेवर पोहोचतील आणि विकासाचा नवा पर्व सुरू होईल.
मुख्यमंत्री साहेबांनी या गंभीर प्रश्नाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहून तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी देशमुख यांनी केली. अहिल्यानगरच्या जनतेच्या अपेक्षांनुसार जिल्हा विभाजन ही काळाची गरज असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
